लग्नाच्या जेवणातून सुमारे १०० जणांना विषबाधा; चार महिलांची प्रकृती गंभीर
By चुडामण.बोरसे | Published: December 22, 2023 12:11 AM2023-12-22T00:11:05+5:302023-12-22T00:11:21+5:30
विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरू
संजय सोनार, चाळीसगाव (जि. जळगाव) : एका लग्न समारंभातील जेवणातून सुमारे १०० लोकांना विषबाधा झाली. ही घटना गुरुवारी सायंकाळच्या सुमारास घडली. विषबाधा झालेल्यांना उपचारासाठी शहरातील वेगवेगळ्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यात तरुण, वृद्ध व महिलांचा समावेश आहे. यापैकी चार वृद्ध महिलांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, ही विषबाधा कोणत्या अन्नातून झाली? याबाबत माहिती मिळाली नाही. बाधितांची संख्या वाढल्याने अनेक वऱ्हाडी भयभीत झाले आहेत.
चाळीसगाव तालुक्यातील हिरापूर येथील एका कुटुंबातील मुलाचा विवाह शहरातील हिरापूररोड असलेल्या लॉन्स येथे गुरुवारी पार पडला. या लग्नात जेवणाच्या पंगती पार पडत होत्या. याच जेवणावळीतून अनेकांना उलटी, मळमळ अशाप्रकारचा त्रास जाणवू लागला. उपचारासाठी दाखल झालेले अनेक जण असले तरीही या लग्नातून जेवण करून गेलेल्या बाहेरगावच्या पै-पाहुण्यांची काय परिस्थिती आहे? ते समजू शकले नाही. त्यामुळे बाधा झाल्याचा प्राथमिक अंदाज शंभरपेक्षा अधिक असले तरी ही संख्या वाढण्याची शक्यता आहे.
तीन ते चार ज्येष्ठ महिलांचा रक्तदाब कमी झाल्याने त्यांची प्रकृती स्थिर नाही. इतर रुग्णांची तपासणी करून उपचार सुरू आहेत.
-डॉ. अभिषेक अग्रवाल, चाळीसगाव.
या घटनेबाबत शहर पोलिस स्टेशनला कुणीही माहिती दिलेली नाही. त्यामुळे या घटनेची माहिती नाही.
-संदीप पाटील, पोलिस निरीक्षक, शहर पोलिस स्टेशन, चाळीसगाव.