पशुसंवर्धन विभागामार्फत १३६९ शिबिरातून २३९३६ जनावरांची वंध्यत्व तपासणी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 6, 2024 04:43 PM2024-01-06T16:43:19+5:302024-01-06T16:44:11+5:30
जिल्ह्याच्या पशुसंवर्धन विभागामार्फत १३६९ शिबिराच्या माध्यमातून २३९३६ जनावरांची वंध्यत्व तपासणी करण्यात आली.
कुंदन पाटील, जळगाव : गाय व म्हैसवर्गीय जनावरांमध्ये शंभर टक्के प्रजनन क्षमता व्हावी, त्यांचे वंध्यत्व कमी व्हावे. यासाठी जिल्ह्याच्या पशुसंवर्धन विभागामार्फत १३६९ शिबिराच्या माध्यमातून २३९३६ जनावरांची वंध्यत्व तपासणी करण्यात आली,अशी माहिती जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ.श्यामकांत पाटील यांनी दिली आहे.
जिल्ह्यात १ डिसेंबर ते ३१ डिसेंबर २०२३ या कालावधीत विशेष मोहीम घेत वंध्यत्व निवारण अभियान राबविण्यात आले. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद व मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित यांच्या सूचना व मार्गदर्शनानुसार हे अभियान राबविण्यात आले. या अभियानात जिल्ह्यात वंध्यत्वाने बाधित दुभती जनावरे यांची तपासणी करून त्यांच्या उपचार शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते.
देशपातळीवर महाराष्ट्राचा दूध उत्पादनात सहावा क्रमांक असून २०१९ च्या २९ व्या पशुगणनेनुसार जिल्ह्यात ८ लाख ५० हजार गाय व म्हैस वर्ग पशुधन आहेत, यातील ३५८२५० गाय व म्हैस वर्गीय जनावरे प्रजननक्षम आहेत. या अभियानातील शिबिरात गाई म्हशींच्या प्रजनन माजाचे चक्र, माज लक्षणे, म्हशीं मधील मुका माज, कृत्रिम रेतन गर्भ तपासणी, वंध्यत्व निवारण, वैरण विकास कार्यक्रम, पशु यांचे आरोग्य तपासणी करण्यात आली.