आठवीपर्यंतचे सुमारे चार लाख विद्यार्थी विनापरीक्षा पास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2021 04:16 AM2021-04-04T04:16:30+5:302021-04-04T04:16:30+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. या पार्श्वभूमीवर शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी इयत्ता पहिली ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. या पार्श्वभूमीवर शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी इयत्ता पहिली ते आठवी वर्गापर्यंतच्या विद्यार्थ्यांना थेट पास करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार जळगाव जिल्ह्यातील सुमारे चार लाखाच्यावर विद्यार्थी विना परीक्षा पास होणार आहेत. या निर्णयाचे शिक्षक संघटनांनी स्वागत केले आहे.
कोरोनामुळे गेल्या वर्षभरापासून सर्वच शाळा जवळपास बंदच आहेत. मात्र, अजूनही पहिली ते चौथीपर्यंतचे वर्ग सुरू झाले नाहीत. तर पाचवी ते आठवीपर्यंतच्या शाळा मध्यंतरी सुरू केल्या होत्या. केवळ, ऑनलाईन, ऑफलाईन, यूट्यूब, गुगलच्या माध्यमातून शिक्षण सुरू ठेवले होते. दरम्यान, देशातील मोफत शिक्षण कायद्याच्या अंतर्गत विद्यार्थ्यांचे वार्षिक मूल्यमापन करणे आवश्यक असते. मात्र, यंदा ते शक्य नाही. त्यामुळे पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना थेट पास करण्याचा निर्णय वर्षा गायकवाड यांनी घेतला आहे. जळगाव जिल्ह्यात सुमारे चार लाखाच्यावर विद्यार्थी पहिली ते आठवीच्या वर्गात प्रवेशित आहेत. या विद्यार्थ्यांना निर्णयाचा लाभ होणार आहे. दरम्यान, काही शाळांच्या काही दिवसांपूर्वी परीक्षा सुध्दा आटोपल्या आहेत.
==================
पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना आरटीई कायद्यानुसार उत्तीर्ण केले जात असले तरी विनापरीक्षेशिवाय त्यांना उत्तीर्ण केले जात आहे. त्याचे कारणही तसेच आहे. पहिली ते चौथीच्या शाळा सुरू होऊ शकल्या नाहीत. पाचवी ते आठवीच्या शाळा काही ठिकाणी काही दिवस सुरू झाल्या. शिक्षण मात्र थांबले नाही. परंतु परीक्षा कशी घ्यायची आणि उत्तीर्णतेचे निकष काय राहतील यासंदर्भात संभ्रम होता. दरम्यान, स्वाध्याय उपक्रमातून विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करण्यात येत होते. परंतु त्यात सर्वच विद्यार्थी सहभागी होत नसल्याने एकवाक्यता येत नव्हती. परंतु कोरोनामुळे घेतलेल्या मूल्यमापनाविना उत्तीर्ण या निर्णयाने विद्यार्थ्यांसह पालकांना दिलासा मिळाला आहे.
- डॉ. जगदीश पाटील, मराठी भाषा अभ्यास मंडळ सदस्य, बालभारती, पुणे.
===============
शिक्षण हक्क कायद्यातंर्गत पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांचे वर्षभर मूल्यमापन केले जाते. परंतु, कोरोनामुळे विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणच देता आले. त्यातही ॲन्ड्रॉईड मोबाईल, इंटरनेट या यासारख्या सुविधांअभावी ३५ ते ४० टक्के विद्यार्थी ऑनलाईन शिक्षणापासून वंचित राहिले. शिक्षकांसमोर निकालाचा प्रश्न निर्माण झाला होता. सरकारच्या या निर्णयामुळे शिक्षक, पालक व विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.
- नारायण वाघ, शिक्षणतज्ज्ञ
=================
कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता मुलांना शाळेत स्वतः परीक्षा देण्यासाठी उपस्थित राहणे शक्य नाही. तसेच वर्षभर ऑनलाईन, यूट्यूब, विद्यार्थी गृहभेटी या माध्यमातून शिक्षण प्रक्रिया सुरु आहे. शाळा प्रत्यक्ष सुरु न झाल्यामुळे सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापनानुसार मूल्यमापन झालेले नाही. त्यामुळे मूल्यमापनासाठी कोणती कार्यपद्धती वापरावी हा मोठा प्रश्न निर्माण झाला असता, सध्याच्या कोरोनाच्या संकटामुळे इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेशिवाय पुढील वर्गात पास करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. हा निर्णय स्वागतार्ह आहे.
- संदीप पाटील, शिक्षक
=================
शासनाने दिलेला निर्णय हा योग्यच म्हणावा लागेल. कारण मागच्या वर्षी तरी विद्यार्थ्यांना अभ्यासक्रम पूर्ण झाला होता. पण यावर्षी पहिली ते चौथीच्या वर्गाच्या शाळाच उघडल्या नाही. आणि पाचवी ते आठवी शाळा कुठे उघडल्या तर कुठे उघडल्याच नाहीत. ऑनलाईन शिक्षण देऊनसुध्दा अभ्यासक्रम पूर्ण करता आलेला नाही. त्यामुळे शासनाने दिलेल्या निर्णयाचे या परिस्थितीत आपल्याला योग्यच मानावे लागेल.
- दीपाली भालेराव, पालक
================
जळगाव जिल्ह्यातील लाखाच्यावर विद्यार्थ्यांकडे ऑनलाईन सुविधा नाही. परिणामी, त्यांना ऑनलाईन शिक्षणापासून वंचित राहावे लागले. त्या दृष्टीने हा निर्णय योग्य आहे. मात्र, कोरोनाच्या काळात विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षण कसे पोहचविता येईल. यासाठी शिक्षण विभागाने पाऊल उचलले पाहिजे. अन्यथा गुणवत्ता ढासळेल.
- प्रशांत सोनार, पालक