अजित पवारांच्या अनुपस्थितीने चर्चेला उधाण
By Admin | Published: April 17, 2017 12:41 AM2017-04-17T00:41:30+5:302017-04-17T00:41:30+5:30
शेतकरी संघर्ष यात्रा : नंदुरबारच्या सभेत बड्या नेत्यांची पाठ, रणरणत्या उन्हातही मोठी उपस्थिती
नंदुरबार : कर्जमाफीच्या मागणीसाठी काँग्रेस-राष्टÑवादी व समविचारी पक्षांच्या आघाडीच्या आमदारांनी काढलेल्या शेतकरी संघर्ष यात्रेच्या सभेसाठी नंदुरबारच्या सभेत हजारो शेतकरी जमले खरे, पण बड्या नेत्यांनी या सभेकडे पाठ फिरवल्याने शेतकºयांचा हिरमोड झाला. विशेष म्हणजे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार हे संघर्ष यात्रेच्या बसमध्ये आले पण नंदुरबारच्या सीमेवरूनच ते दुसºया वाहनाने रवाना झाल्याने त्याबाबत विविध अटकळे लावले जात आहेत.
शेतकरी संघर्ष यात्रा शनिवारपासून खान्देशात आली आहे. जळगाव व धुळे जिल्ह्यात विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील तसेच माजी उपमुख्यमंत्री अजित पवार हे दोन्ही नेते होते. नंदुरबार जिल्ह्यात या संघर्ष यात्रेचे शहाद्यात स्वागत व नंदुरबारला शेतकरी मेळावा असा कार्यक्रम होता. त्यानुसार शहाद्यात संघर्ष यात्रेच्या बसमध्ये पहिल्याच आसनावर माजी उपमुख्यमंत्री अजित पवार बसले होते. शहादा येथे या यात्रेचे कार्यकर्त्यांनी स्वागत केले. त्यांच्या आग्रहावरून अजित पवार यांनी बसमधून खाली उतरून शेतकºयांशी पाच मिनिटे व्यासपीठावरून संवादही साधला. त्यानंतर पुन्हा बसमध्ये बसून ते नंदुरबारकडे निघाले.
प्रकाशा येथेदेखील कार्यकर्त्यांनी त्यांचे स्वागत केले. पुढे ‘आॅस्टोरिया’ कारखान्याच्या प्रवेशद्वारावर तेथील कर्मचाºयांनी त्यांना धावत्या बसमध्येच सलामी दिली. नंदुरबारच्या सीमेवर मात्र बसमधून उतरून ते परस्पर दुसºया वाहनात बसून रवाना झाले.
नंदुरबार येथील सभेला मोठ्या संख्येने शेतकरी जमले होते. या सभेला माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण हेदेखील येणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. प्रत्यक्षात संघर्ष यात्रेच्या बसमधून बड्या नेत्यांचे दर्शन झाले नाही. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार चंद्रकांत रघुवंशी यांना मात्र माजी उपमुख्यमंत्री अजित पवार हे येणार असल्याची खात्री होती. त्यामुळे त्यांनी सूत्रसंचालन करताना वारंवार उपस्थितांना त्याबाबत माहिती देत होते. नव्हे तर अजित पवार आल्यानंतर कुठली घोषणा द्यायची त्याचा सरावदेखील त्यांनी उपस्थितांकडून करून घेतला होता. संघर्ष यात्रा व्यासपीठावर आल्यानंतरदेखील त्यांना अजित पवार यांची प्रतीक्षा होती. वारंवार ते चौकशी करून मोबाइलने संवाद करत होते. व्यासपीठावरील तीन नेत्यांची भाषणे झाली तरी त्यांची प्रतीक्षा होतीच. अखेर आमदार माणिकराव शिंदे यांनी व्यासपीठाचा ताबा घेऊन आपले छोटेखानी भाषण केले व अजित पवार धुळ्याच्या सभेला रवाना झाल्याचे सांगून सभेचा समारोप केला.
एकूणच नंदुरबारच्या सभेला काँग्रेस व राष्टÑवादीचेही बडे नेते आले नसल्याने त्याबाबत उपस्थितांमध्ये उलटसुलट चर्चा होती. विरोधी पक्षनेते धुळे व जळगाव जिल्ह्यात आले, नंदुरबारला का येऊ शकले नाही? राष्टÑवादीचे नेते अजित पवार नंदुरबारच्या सीमेवर आले; पण सभेला का आले नाही? असे प्रश्न कार्यकर्त्यांमध्ये चर्चिले जात होते. या प्रश्नांची उत्तरे देणे मात्र आयोजकांनादेखील कोडं होते. कारण तेदेखील त्याचे स्पष्टीकरण करू शकले नाहीत. सभा संपल्यानंतर काँग्रेस व राष्टÑवादीच्या प्रमुख कार्यकर्त्यांना याबाबत विचारले असता त्यांनीही त्याचे स्पष्टीकरण दिले नाही.
रणरणत्या उन्हातही शेतकºयांची उपस्थिती...
सभेची वेळ दुपारी चार वाजेची होती. त्यामुळे अडीच ते तीन वाजेपासूनच नंदुरबार, नवापूर, तळोदा भागातील शेतकरी दाखल होत होते. गेल्या दोन दिवसांपासून तापमानात वाढ झालेली असल्यामुळे जिवाची काहिली करणारे ऊन आणि असह्य उकाडा यात शेतकरी विविध वाहनांनी दाखल होत होते. सभेची वेळ दुपारी चार वाजेची होती. साडेचार वाजता आमदार जयंत पाटील, आमदार जोगेंद्र कवाडे, आमदार अबू आजमी दाखल झाले. त्यांनी आपल्या घणाघाती भाषणात सरकारवर टीका केली. त्यानंतर संघर्ष यात्रेने दाखल झालेले भाई जगताप, जितेंद्र आव्हाड यांनीदेखील मनोगत व्यक्त करीत कर्जमाफीची मागणी केली.