परीक्षा देऊनही विद्यार्थी गैरहजर, तक्रारीनंतर निकालात सुधारणा
By अमित महाबळ | Published: April 21, 2023 06:28 PM2023-04-21T18:28:05+5:302023-04-21T18:28:20+5:30
परीक्षा देणारे विद्यार्थी गैरहजर असल्याचे निकालात दाखविले जाणे हे काही नवीन राहिलेले नाही.
जळगाव : परीक्षा देणारे विद्यार्थी गैरहजर असल्याचे निकालात दाखविले जाणे हे काही नवीन राहिलेले नाही. गेल्या महिन्यात मुक्ताईनगर तालुक्यातील एका कॉलेजमधील १४ विद्यार्थ्यांबाबत हाच प्रकार घडला. तक्रारीनंतर विद्यापीठाने निकालात सुधारणा केली आणि १२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
संत मुक्ताबाई कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, मुक्ताईनगर येथील तृतीय वर्ष कला शाखेच्या सत्र पाचमधील इन्ट्रोडक्शन ऑफ पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन (पीयूबी ३५१) या विषयाची परीक्षा डिसेंबर २०२२ मध्ये झाली. एक महिन्यापूर्वी निकाल लागला. त्यामध्ये १४ विद्यार्थी परीक्षेला गैरहजर असल्याचे दाखविण्यात आले होते. परीक्षार्थींसह अभाविपचे शहरमंत्री रुपेश कोळी, तालुका सहसंयोजक विश्वजीत देशमुख, सौरभ पाटील यांनी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे सिनेट सदस्य दिनेश चव्हाण यांच्याकडे या विषयी तक्रार केली. हा विषय महाविद्यालय व विद्यापीठ प्रशासनाकडे मांडण्यात आला. महाविद्यालयाने आपली माहिती (जेएसआर) विद्यापीठाला पाठवली. त्यानंतर विद्यापीठाने सुधारित निकाल लावला. त्यात १२ विद्यार्थी उत्तीर्ण तर दोन जण अनुत्तीर्ण झाले आहेत.