कुलगुरूंची पाऊण तास अनुपस्थिती अन‌् सदस्यांचा दीड तास गोंधळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2021 04:16 AM2021-03-26T04:16:56+5:302021-03-26T04:16:56+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील अत्यंत महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या अर्थसंकल्पाच्या अधिसभा बैठकीला गुरुवारी ...

Absence of Vice-Chancellor for half an hour and confusion of members for one and half hours | कुलगुरूंची पाऊण तास अनुपस्थिती अन‌् सदस्यांचा दीड तास गोंधळ

कुलगुरूंची पाऊण तास अनुपस्थिती अन‌् सदस्यांचा दीड तास गोंधळ

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील अत्यंत महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या अर्थसंकल्पाच्या अधिसभा बैठकीला गुरुवारी कुलगुरूच उपस्थित नसल्यामुळे सदस्यांनी प्रचंड गोंधळ घातला. कुलगुरूंशिवाय बैठक सुरूच झालीच कशी, बैठक तत्काळ बेकायदेशीर ठरवून संबंधितांवर कारवाई करण्‍यात यावी, असा आक्रमक पवित्रा घेत विद्यापीठ प्रशासनाला सदस्यांनी चांगलेच धारेवर धरले होते. अखेर पाऊण तासानंतर कुलगुरूंनी ऑनलाइन बैठकीत हजेरी लावून सर्वांची क्षमा मागितली व बैठक स्थगित करीत २० दिवसांनंतर ऑफलाईन पद्धतीने अधिसभा घेण्‍याचा निर्णय घेतला. त्यानंतर गोंधळ शांत झाला. तब्बल दीड तास सदस्यांचा गोंधळ सुरू होता.

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाची अधिसभेची ऑनलाईन बैठक प्रभारी कुलगुरू प्रा. ई. वायुनंदन यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी सकाळी ११ वाजता आयोजित करण्यात आली. डॉ. शामकांत भादलीकर यांनी प्रभारी कुलसचिव तथा सचिव अधिसभा म्हणून कामकाज पाहिले. सभेची सुरुवात राष्ट्रगीताने होऊन शोकसंदेशांवर चर्चा झाली. दरम्यान, सुरुवातीला बैठकीत कुलगुरू उपस्थित नसल्यामुळे अधिसभा सदस्य एकनाथ नेहते यांनी सभेचे अध्यक्ष अर्थात कुलगुरू उपस्थित नसताना बैठक सुरू झालीच कशी? असा सवाल उपस्थित केला. त्यावर भादलीकर यांनी कुलगुरू हे त्यांच्या वैयक्तिक समस्येमुळे उपस्थित राहू शकले नाहीत, असे सांगितल्यानंतर बैठकीत एकच गोंधळ उडून सदस्य आक्रमक झाले.

हा तर सदस्यांचा अवमान आहे...

अर्थसंकल्पाची व लेखापरीक्षणाची अत्यंत महत्त्वाची बैठक असताना बैठकीचे अध्यक्ष अर्थात कुलगुरू उपस्थित राहत नाहीत, ही बाब गंभीर असल्याचे म्हणत सदस्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यानंतर कुलगुरू उपस्थित नसताना सभा सुरूच कशी झाली, असा सवाल पुन्हा अधिसभा सदस्य विष्णू भंगाळे व अनिल पाटील यांनी उपस्थित करीत विद्यापीठात सावळागोंधळ सुरू असल्याचा आरोप केला. तसेच ही सभा ग्राह्य धरली जाणार नसून हिला बेकायदेशीर ठरवून बैठक रद्द करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली. तर हा सदस्यांचा अवमान असून माफी मागावी, अशीही मागणी सदस्यांनी केली होती.

,,,अन‌् बैठक सोडण्याचे आव्हान

अर्धा तास उलटूनही कुलगुरूंनी बैठकीला हजेरी न लावल्यामुळे सदस्यांचा संताप अनावर झाला. एक तर बैठक रद्द करण्‍यात यावी अन्यथा कुलगुरूंनी आपल्या प्रश्नांचे उत्तर द्यावे, असा पवित्रा सदस्यांनी घेतला. अन्यथा कुलगुरूंविना बैठक ज्यांनी सुरू केली, त्यांच्यावर कारवाई करण्‍यात यावी, अशी मागणी सदस्यांमधून जोर धरू लागली. कुलगुरू बैठकीत जॉईन होत नसल्यामुळे अखेर बैठकीतून इतरांनीही बाहेर पडावे, असाही पवित्रा सदस्यांनी घेतला होता.

कुलगुरू नसताना इतिहासात पहिली सभा

कुलगुरू नसताना विद्यापीठातील अर्थसंकल्पाची बैठक होणे ही विद्यापीठाच्या इतिहासातील पहिली घटना आहे. त्यामुळे ही सभा तत्काळ रद्द करून ती ऑफलाईन पद्धतीने घ्यावी व आता हक्कभंगाचा ठराव करण्यात यावा, असे विष्णू भंगाळे व एकनाथ नेहते यांनी बैठकीत सांगितले.

आपण क्षमा मागतो...

बैठकीला पाऊण तास उलटल्यानंतर कुलगुरूंनी वाहनातूनच ऑनलाईन हजेरी लावली. नंतर सदस्यांनी त्यांना चांगलेच धारेवर धरत प्रश्नांची सरबत्ती केली. प्रभारी कुलगुरू प्रा. ई. वायुनंदन यांनी पत्नी कोरोनाबाधित झाल्याने त्यांना सभेत उपस्थित होण्यास उशीर झाला असल्याचे स्पष्ट केले. त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करून त्यांनी सर्वांची क्षमा मागितली व कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार अधिसभेचे कामकाज ऑनलाईन घेण्यात येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

कुलगुरू म्हणाले.... अरे, मुझे तो बोलने दो !...

बैठकीला उशीर का झाला हे सांगत असताना, सदस्यांनी प्रभारी कुलगुरूंवर प्रश्नांची सरबत्ती केली. अखेर ‘मुझे तो बोलने दो’ अशी विनंती त्यांनी अनेक वेळा केली. मात्र, सदस्य त्यांचे म्हणणे ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हते. घडलेला हा प्रकार हा केवळ माझ्या चुकीमुळे झाला असल्याचे म्हणत कुलगुरूंनी पाच ते सहा वेळा अधिसभा सदस्यांची माफी मागितली. त्यानंतर सदस्यांनी बैठक रद्द करण्याची मागणी रेटून धरली.

आणि... बैठक स्थगित

दरम्यान, अधिसभेतील मोजक्या सदस्यांनी अधिसभेचे कामकाज ऑफलाईन घेण्याचा आग्रह केला. त्यांचा आग्रह विचारात घेऊन अधिसभेचे कामकाज कुलगुरूंनी तूर्त स्थगित केले. विद्यापीठाने ऑफलाईन अधिसभा ३० मार्च रोजी आयोजित करण्याबाबत जिल्हाधिकारी यांच्याकडे विनंती अर्ज दिला असून, त्यानुसार पुढील कार्यवाही करण्यात येईल, असे विद्यापीठातर्फे प्रभारी कुलसचिव डॉ. शामकांत भादलीकर यांनी कळविले आहे. यावेळी बैठकीत माजी आमदार सतीश पाटील, डॉ. गौतम कुंवर, प्रा. डॉ. अनिल लोहार, प्रकाश अहिराव, डॉ. सुनील गोसावी, ए. टी. पाटील, नितीन ठाकूर, संध्‍या सोनवणे, संदीप पाटील, प्रशांत सोनवणे, अनिल पाटील, राजेंद्र पाटील, आदींची उपस्थिती होती.

महत्त्वाचे विषय असलेली सभा ऑनलाईन पद्धतीने आयोजित करणे, हे मुळात चुकीचे असून आयोजनाच्या हेतुशुद्धतेबद्दल शंका उपस्थित करणारे होते. त्यात प्रभारी कुलगुरूंना अधिसभेबद्दल अधिक माहिती नसल्यामुळे विद्यापीठातील प्रभारी राजमुळे किती भोंगळ कारभार चालू आहे, ते या अधिसभेतील प्रकारामुळे चव्हाट्यावर आले. राज्य शासनाने संपूर्ण प्रकाराची चौकशी करावी.

- एकनाथ नेहते, अधिसभा सदस्य

अध्यक्षांशिवाय बैठक बेकायदेशीरपणे आयोजित करण्यात आली असल्याचा गंभीर आरोप बैठकीत झाला. तो आरोप नव्हे तर वास्तविकता आहे. सभा रद्द होणे ही इतिहासातील पहिलीच घटना आहे. ही विद्यापीठ विकासाच्या दृष्टीने खेदाची बाब आहे. यापुढे प्रशासनाने पारदर्शकता ठेवत विद्यापीठाचा कारभार सुरळीत चालू राहील याची काळजी घेणे आवश्यक आहे.

- प्रा. डॉ. गौतम कुवर

सिनेटची सभा मुळात ऑफलाईन घ्यायला हवी होती. ती ऑनलाईन आयोजित केली. कुठलीही पूर्वसूचना न देता बैठकीचे सचिव बदलेले. सर्वांत महत्त्वाचे हे की तात्पुरत्या सचिवांनी अध्यक्ष उपस्थित नसताना सभा सुरू केली आणि ४५ मिनिटे चालविली. त्यामुळे ही सभा बेकायदेशीर होती. या भोंगळ कारभाराची राज्य सरकारने सखोल चौकशी करावी, अशी मागणी करणार आहे..

- अनिल पाटील, अधिसभा सदस्य

Web Title: Absence of Vice-Chancellor for half an hour and confusion of members for one and half hours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.