जेल तंत्रज्ञानामुळे होणार रक्तगटाचे अचूक निदान - अधिष्ठाता डॉ.बी.एस.खैरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2018 01:09 PM2018-09-27T13:09:28+5:302018-09-27T13:09:58+5:30
जळगावात शासकीय वैद्यकिय महाविद्यालयात कार्यशाळा
जळगाव : रक्तगट तपासणीत आता ‘जेल टेक्नॉलॉजी’ हे नवीन तंत्रज्ञान आले असून त्यामुळे रक्तगट तपासणीचे शंभर टक्के अचूक निदान होणार आहे, त्यामुळे विविध तपासण्या व उपचारातील संभाव्य धोके टळणार असल्याचे प्रतिपादन शासकीय वैद्यकिय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.बी.एस.खैरे यांनी केले.
शासकीय वैद्यकिय महाविद्यालय अंतर्गत रक्तपेढी विभागात बुधवारी ‘जेल टेक्नॉलॉजी’ या नव्या तंत्रज्ञानावर कार्यशाळा झाली. अधिष्ठाता डॉ.खैरे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करुन कार्यशाळेचे उद्घाटन झाले. यावेळी वैद्यकिय अधीक्षक डॉ.किरण पाटील, विभागप्रमुख प्रा.डॉ.शैला पुराणिक, शरीर विकृती शास्त्र विभागप्रमुख डॉ.योगिता बाविस्कर, प्रा.डॉ.इम्रान पठाण, डॉ.अर्जुन सुतार, डॉ.विजय जयकर, उमेश कोल्हे यांच्यासह रक्तपेढीतील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. जेल तंत्रज्ञान व रक्त गट तपासणीबाबत टुलिप डायग्नोस्टिक या कंपनीचे संचालक कल्पेश जैन यांनी प्रात्यक्षिक करुन दाखविले तसेच रुग्णांना अधिक सुरक्षित रक्ताचा पुरवठा कसा करता येतो त्याचे महत्व विषद केले. प्रास्ताविक रक्तपेढी वैज्ञानिक अधिकारी रोहीणी देवकर यांनी केले. तर आभार रक्तपेढीचे रक्तसंक्रमण अधिकारी डॉ.अर्जुन सुतार यांनी मानले.