अहमदाबाद - हावडा एक्सप्रेसच्या एसी डब्याला आग;
By चुडामण.बोरसे | Published: March 4, 2024 02:25 PM2024-03-04T14:25:48+5:302024-03-04T14:26:15+5:30
ही घटना बेटावद ता. शिंदखेडा जवळील पांझरा नदीच्या पुलावर ४ रोजी सकाळी ९ वाजता घडली. रेल्वे अधिकाऱ्यांच्या सतर्कतेने मोठा अनर्थ टळला.
अमळनेर (जि.जळगाव) : अहमदाबाद - हावडा एक्सप्रेसच्या एका एसी डब्याच्या चाकांमध्ये दोष निर्माण झाल्याने आग लागून धूर निघाला. ही घटना बेटावद ता. शिंदखेडा जवळील पांझरा नदीच्या पुलावर ४ रोजी सकाळी ९ वाजता घडली. रेल्वे अधिकाऱ्यांच्या सतर्कतेने मोठा अनर्थ टळला.
अहमदाबाद - हावडा (क्र. १२८३३) एक्स्प्रेस सकाळी ९ वाजेच्या सुमारास बेटावद स्टेशनहून सुटल्यावर पांझरा नदी पुलावर आली. त्याचवेळी बी - ८ या बोगीच्या चाकातून अचानक धूर निघू लागला आणि गाडीचा डब्बा गरम वाटू लागल्याने गाडीतच बसलेले स्टेशन अधीक्षक (वाणिज्य) प्रमोद ठाकूर यांनी तातडीने टीटीई धीरजकुमार यांच्या मदतीने रेल्वे थांबवली. प्रवाशी घाबरून खाली उतरून पळू लागले होते.
ठाकूर, धीरजकुमार, गँगमन देवेंद्र बासू आदींनी रेल्वेतीलच १२ ते १६ अग्निशमन सिलेंडर काढून आग नियंत्रित केली. त्यांनतर संपूर्ण गाडी तपासण्यात आली. यासाठी सुमारे एक तास ४० मिनिटे लागली. भुसावळपर्यंत गाडीचा वेग ताशी ७० किमीपर्यंत ठेवण्याच्या सूचना लोकोपायलटला देण्यात आल्या. वेळीच ही बाब निदर्शनास आल्याने आग आटोक्यात आली. अन्यथा वार्यामुळे आग भडकून अनर्थ घडला असता.