पुनर्वसनासाठी पर्यायी जागेचा शोध घेऊन भागपूर प्रकल्पाला गती द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2021 04:16 AM2021-05-08T04:16:03+5:302021-05-08T04:16:03+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : जिल्ह्यातील सिंचन क्षमता वाढविण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या भागपूर उपसा सिंचन योजनेस गती येण्यासाठी या प्रकल्पाचा ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : जिल्ह्यातील सिंचन क्षमता वाढविण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या भागपूर उपसा सिंचन योजनेस गती येण्यासाठी या प्रकल्पाचा भूसंपादन व पुनर्वसनाचा प्रश्न सर्व संबंधित विभागांनी प्राधान्याने मार्गी लावावा, असे निर्देश पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले. त्यामध्ये भागपूर गावातील रहिवाशांच्या पुनर्वसनासाठी पर्यायी जागेचा शोध घ्या अशाही सूचना पालकमंत्र्यांनी दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयात भागपूर उपसा सिंचन योजनेची आढावा बैठक पालकमंत्री पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली, यावेळी ते बोलत होते. या बैठकीस जिल्हाधिकारी अभिजित राऊत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी संभाजी ठाकूर, भूसंपादन अधिकारी शुभांगी भारदे, राजेंद्र वाघ, किरण सावंत-पाटील, कार्यकारी अभियंता कडलग आदी उपस्थित होते.
नजीकच्या गावांमध्ये उपलब्ध जागेचा सर्व्हे करा
भागपूर गावाचे पुनर्वसन करण्यासाठी लागणाऱ्या जागेचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी नजीकच्या गावांमध्ये उपलब्ध जागेचा सर्व्हे करण्यात यावा, असे पालकमंत्री पाटील यांनी यावेळी सांगितले. आसपासच्या ज्या गावात जागा शिल्लक असेल तेथील ग्रामसभेचा ठराव घेणे, तो जिल्हा परिषदेस सादर करणे आदी कामे संबंधित विभागाने वेळेत करण्याची कार्यवाही करावी. शिवाय जागेची किंमत ठरविण्याचे काम कृषि व वन विभागाने करुन जागेचे भूसंपादनाचे काम भूसंपादन विभागाने करण्याची सूचनाही त्यांनी यावेळी केली.
ग्रामसभेचा ठराव मिळाल्यानंतर जिल्हा परिषदेकडील कार्यवाही तातडीने पूर्ण करण्यात येईल असे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पाटील यांनी सांगितले. तर आवश्यक ती कार्यवाही झाल्यानंतर भूसंपादनाची प्रक्रीया करण्यात येईल. असे जिल्हाधिकारी राऊत यांनी संगितले.
भागपूर गावात सध्या ८४ नोंदणीकृत घरे तसेच ४९ अतिक्रमीत झोपड्या असून लोकसंख्या ३७० आहे. या गावाचे पुनर्वसन करण्यासाठी अंदाजे १२ हेक्टर जागा अपेक्षित असल्याचे भूसंपादन अधिकारी भारदे यांनी सांगितले. तर प्रकल्पाविषयीची माहिती व येत असलेल्या अडचणीची माहिती कार्यकारी अभियंता कडलग यांनी दिली. यावर तातडीने तोडगा काढून आवश्यक ती कार्यवाही सर्व संबंधित विभागांनी करावी, असे निर्देश पालकमंत्री पाटील यांनी दिले.