कापूस खरेदीचा वेग वाढवा-पालकमंत्र्यांचे आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2020 08:21 PM2020-05-28T20:21:29+5:302020-05-28T20:21:35+5:30
कासोदा कापूस खरेदी केंद्राला भेट
कासोदा, ता. एरंडोल : पावसाळ्याला लवकर सुरवात होणार असल्याने कापूस खरेदीचा वेग वाढवला पाहिजे, दररोज किमान ५० वाहनांची खरेदी झाली पाहिजे, असे आदेश पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी खरेदी केंद्राच्या संचालकांना दिले आहेत.
येथील सीसीआयच्या कापूस खरेदी केंद्राला पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी गुरुवारी भरदूपारी भेंट देऊन शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी कापूस भरलेली वाहने मोठ्या प्रमाणावर उभी होती. शेतकऱ्यांनी यावेळी माल लवकर खरेदी केला जात नसल्याच्या तक्रारी केल्यानंतर मंत्र्यांनी हे आदेश दिलेत.
यावेळी जि.प.माजी उपाध्यक्ष व जिनींग मालक मच्छिंद्र पाटील, बाजार समीतीचे सभापती सुनील पवार, डॉ. प्रेम सुरंसे, भीकन माळी, भानूदास पाटील, बाळासाहेब पाटील, रवींद्र चौधरी, संजय चौधरी, निलेश अग्रवाल यांच्या सह शेतकरी उपस्थित होते.
दरम्यान लाँकडाऊनमुळे परराज्यातील मजूर निघून गेले आहेत.तापमान मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. प्रेसींग मशीन तापमानामुळे सतत खराब होऊन दुर्घटना होऊ नये ही काळजी घेतली जात असून मोठ्या प्रमाणावर कापूस खरेदी झाल्यामुळे जागा व्यापली गेली आहे, तरी देखील खरेदीचा वेग वाढवणार असल्याचे मच्छिंद्र पाटील यांनी सांगितले.
विभागात सर्वाधिक खरेदी
विभागात सर्वात जास्त खरेदी म्हणजे ७४ हजार ४९५ क्विंटल खरेदी कासोदा केंद्रात झाल्याची माहिती केंद्रप्रमुख डॉ. प्रेम सुरेंसी यांनी दिली आहे.