चाळीसगाव परिसरात खरिपाच्या तयारीला वेग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2021 04:13 AM2021-05-29T04:13:11+5:302021-05-29T04:13:11+5:30

चाळीसगाव : गुरुवारी सायंकाळी मान्सूनपूर्व पावसाने तासभर हजेरी लावल्याने यंदाच्या खरीप हंगामाच्या तयारीला वेग आला आहे. सद्य:स्थितीत हंगामासाठी ...

Accelerate kharif preparations in Chalisgaon area | चाळीसगाव परिसरात खरिपाच्या तयारीला वेग

चाळीसगाव परिसरात खरिपाच्या तयारीला वेग

Next

चाळीसगाव : गुरुवारी सायंकाळी मान्सूनपूर्व पावसाने तासभर हजेरी लावल्याने यंदाच्या खरीप हंगामाच्या तयारीला वेग आला आहे. सद्य:स्थितीत हंगामासाठी पूर्वमशागतीची कामे अंतिम टप्प्यात आहे. काही भागांत मान्सूनपूर्व कपाशीची लागवड केली जात आहे. कृषी विभागाने यावर्षी ९० हजार हेक्टरवर खरिपाच्या लागवडीचे उद्दिष्ट ठेवले आहे. यावर्षी कपाशीचा पेरा वाढणार असून, मक्याची लागवड १० ते १५ टक्क्यांनी कमी होईल.

खरिपाच्या लागवडीसाठी शेतशिवार सज्ज झाले असून, मशागतीची कामे अंतिम टप्प्यात आली आहेत. यावर्षीही खरिपाच्या लागवडीत कपाशीचाच वरचष्मा राहणार असून, मका लागवडीचे क्षेत्र १० ते १५ टक्क्यांनी घटणार आहे. दोन लाख ८७ हजार ८५० कपाशी बियाणे पाकिटांचा पेरा केला जाणार आहे. यावर्षी रासायनिक खतांचा १० टक्के कमी पुरवठा होणार असल्याने टंचाई जाणवणार आहे.

गतवर्षीच्या खरिपात मका लागवडीचे क्षेत्र वधारले असले तरी ते कपाशीच्या तुलनेत कमीच होते. यंदाही मका लागवडीचे क्षेत्र आणखी घटणार असल्याचे संकेत कृषी विभागाने दिले आहेत. कोरडवाहू व बागायती कपाशीचे क्षेत्र मात्र वाढणार आहे. यावर्षीही बळीराजाची दारोमदार ‘पांढऱ्या सोन्यावरच’ राहणार आहे.

..........

चौकट

९० हजार हेक्टरवर बहरणार खरिपाचा हंगाम

चाळीसगाव तालुक्याचे भौगोलिक क्षेत्र एक लाख २१ हजार ९०४ हेक्टर इतके आहे. यापैकी ९० हजार ३१८ हेक्टर क्षेत्रावर खरिपाचा पेरा होणे अपेक्षित आहे.

१....मका लागवडीचे क्षेत्र घटणार असले तरी काही प्रमाणात भूईमुग, सोयाबीन पेऱ्याचे क्षेत्र वाढणार आहे.

कांदा लागवडही कमी होण्याची शक्यता आहे.

........

चौकट

काळ्या बाजारावर राहणार नजर,

तक्रार निवारण कक्ष कार्यान्वित

बियाणे, खते आणि कीटकनाशके यात शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये यासाठी कृषी विभागाची काळ्या बाजारावर करडी नजर राहणार आहे. यासाठी पंचायत समितीमध्ये तक्रार निवारण कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे. बियाणे, खते व कीटकनाशकांच्या गुणवत्तेबाबत तक्रार निवारण कक्षात तक्रार नोंदवू शकता. भरारी पथकांचीही नियुक्ती करण्यात आली आहे.

.........

चौकट

खतांची टंचाई जाणवणार, १० टक्के कमी पुरवठा

अनुदानित रासायनिक खतांचा १० टक्के कमी वापर या धोरणानुसार जिल्हास्तरावरून रासायनिक खतांच्या पुरवठ्याचे नियोजन होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आतापासूनच खत टंचाईच्या समस्येला तोंड द्यावे लागणार आहे.

-एकूण २८ हजार ३८४ मेट्रिक टन खताची गरज यंदाच्या खरीप हंगामासाठी निर्धारित केली आहे.

.......

गेल्या वर्षीची बनावट खतांची कारवाई गुलदस्त्यात

बनावट खते, बियाणे व कीटकनाशके देऊन शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणावर आर्थिक फसगत केली जाते. हे दरवर्षीचे रडगाणे आहे. गेल्या वर्षी लाखो रुपये किमतीचा बनावट खतांचा साठा चाळीसगाव येथे हस्तगत केला गेला. मात्र, त्याबाबत काय कारवाई झाली. हे अजूनही गुलदस्त्यातच आहे. त्यामुळेच कोरोनाकाळात अगोदरच पिचलेल्या शेतकऱ्यांना बनावट खतांद्वारे लुबाडणूक होण्याची भीती वाटत आहे. कृषी विभागाने अर्लट राहावे, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.

..........

कृषी विभागाने पीकनिहाय पेऱ्याचे केलेले नियोजन (क्षेत्र : हेक्टरमध्ये)

कपाशी बागायती - २७ हजार २११

कपाशी कोरडवाहू - ३४ हजार ४३७

ज्वारी - १२५८

इतर पिके - ३५५१

उडीद - ९३२

तूर - ५२८

भुईमूग - ८२५

सोयाबीन - १५०

फळबाग - ३००

बाजरी - ३५५१

Web Title: Accelerate kharif preparations in Chalisgaon area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.