भातखंडे बुद्रुक परिसरात खरीप पेरण्यांच्या तयारीला वेग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2021 04:17 AM2021-05-27T04:17:20+5:302021-05-27T04:17:20+5:30
भातखंडे बुद्रुक, ता. भडगाव : परिसरात खरीप हंगामात पेरणी कामाच्या तयारीला वेग आला असून मशागतीच्या कामात बळीराजा व्यस्त ...
भातखंडे बुद्रुक, ता. भडगाव : परिसरात खरीप हंगामात पेरणी कामाच्या तयारीला वेग आला असून मशागतीच्या कामात बळीराजा व्यस्त आहे.
भातखंडेसह परिसरात खरीप पेरणीचा हंगाम जवळ येत असल्याने त्यासाठी आवश्यक पेरणीपूर्व मशागतीच्या कामात शेतकरी मग्न झाला आहे. सर्वत्र कामाची लगबग बघावयास मिळत आहे. खरिपाच्या पेरणीपूर्व मशागतीची कामे बऱ्याचअंशी ट्रॅक्टरने केली जात आहेत. डिझेलच्या दरात झालेल्या वाढीमुळे ट्रॅक्टर मशागतीच्या दरामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ केल्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसत आहे.
खरीप हंगामातील पिकांच्या निकोप आणि उत्तम वाढीसाठी जमिनीची पेरणीपूर्व मशागत होणे अत्यंत गरजेचे आहे. जमीन भुसभुशीत व तणविरहित केल्यास पेरणीयोग्य होते, बळीराजाला चांगले उत्पन्न मिळू शकते व चांगल्या मशागतीमुळे पावसाचे पाणी जमिनीत मुरून ओलावा टिकून राहतो व तणांचा प्रादुर्भाव कमी होतो. यावर्षी पाऊस चांगला राहील, असा अंदाज असल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. दोन वर्षांपासून अतिवृष्टीमुळे पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. यावर्षी खरिपाच्या पिकासाठी पेरणीपूर्व मशागतीत रासायनिक खते, पेट्रोल व डिझेल, मजुरी वाढल्याने, शेती कशी करावी? असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे ठाकला आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शेतीमालाला भाव नाही, अशातच डिझेल, पेट्रोल व रासायनिक खतांचे दर वाढल्याने शेतकऱ्यांनी खरिपाची पेरणी कशी करावी? शासनाने तातडीने दखल घेऊन खतांच्या किमती कमी कराव्यात व शेतकऱ्यांना बांधावरच खते आणि बियाणे मिळवून देण्याची व्यवस्था करावी.
- रामकृष्ण बाबूराव पाटील,
आत्मा गटाचे अध्यक्ष, शेतकरी, भातखंडे बुद्रुक, ता. भडगाव
कोरोना काळात डिझेल, पेट्रोल व रासायनिक खतांचे भाव सरकारने वाढविले, त्याचप्रकारे शेतीमालाची भाववाढही शासनाने केली पाहिजे. खाद्यतेल व जीवनावश्यक वस्तूंचे भाव कमी केले पाहिजेत.
- विनोद सुरेश पाटील, शेतकरी, अंतुर्ली बुद्रुक, ता. भडगाव