जामनेर येथे 'कोरोना'ला विसरून व्यवहारांना गती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 8, 2020 01:16 PM2020-06-08T13:16:16+5:302020-06-08T13:20:44+5:30
जामनेर येथे कोरोनाला विसरून अनेक ठिकाणी व्यवहारांना गती देण्यात आली आहे.
(सैय्यद लियाकत/मोहन सारस्वत)
जामनेर, जि.जळगाव : कोरोनाच्या धास्तीमुळे अडीच महिने घरात थांबून असलेले नागरिक आता घराबाहेर पडले आहेत. तालुक्यात कोरोनाबाधितांची संख्या ३९ पर्यंत पोहोचली असली तरी कोरोनाच्या या संकटाला विसरून तालुक्यात व्यवहार सुरू झाले आहेत. तालुक्यात २० मे रोजी कोरोनाचा शिरकाव झाला. त्यानंतर एक-एक रुग्ण संख्या वाढत गेली. शहरात व तालुक्यात कोरोना पोहोचल्याने नागरिकात चांगलीच धास्ती निर्माण झाली आहे. त्यातच तालुक्यातील कोरोनाच्या रुग्णांचा आकडा ३९ पर्यंत पोहोचल्याने ही रुग्णसंख्या आणखी वाढते की काय, अशी धास्ती असतानाच अडीच महिन्यापासून आपले व्यवहार बंद ठेवून घरात थांबलेल्या नागरिक, व्यापाऱ्यांनी शहरातील व तालुक्यातील व्यवहार सुरू केले आहेत. यामुळे आता मेन रोड, बिओटी कॉम्प्लेक्स, वाकी रोड, जळगाव रोड, पाचोरा रोड, गांधी चौक, अरफ़ात चौक, श्रीराम मार्केट या भागात गर्दी पाहायला मिळत आहे. कोरोनाची धास्ती मनात असली तरी अडीच महिन्यांपासून व्यवहार बंद असल्याने उलाढाल थांबली आहे. काम केल्याशिवाय पैसा हातात येणार नाही हे जाणून तालुक्यात व्यवहार पूर्वपदावर आल्याचे दिसत आहे.
तसेच खरेदी-विक्री, नफा तोटा , या विचारांमध्ये कोरोनाचा काहीसा विसर पडला आहे. त्यामुळे अडीच महिन्यांपासून धास्तावलेली मने पुन्हा एकदा नव्याने जीवन जगण्यास तयार झालेले असल्याचे दिसत आहे.
नियमांचे पालन करणे आवश्यक
बंद झालेले व्यवहार पुन्हा सुरू झाले असून फिजिकल डिस्टिंगच्या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. मात्र बहुतांश ठिकाणी नियमांचे उल्लंघन झाल्याचे पाहायला मिळत आहे. अशा परिस्थितीत गर्दी टाळण्यासाठी व्यापाऱ्यांनी उपाययोजना केली पाहिजे.
अनेक कामगार घरी
तालुक्यातील अनेक नागरिक कामाच्या शोधासाठी पुणे, मुंबई, गुजरात, नाशिक या मोठ्या शहरांमध्ये स्थलांतरित झाले होते. मार्च आणि एप्रिल महिन्यात या शहरात कोरोनाचा फैलाव वाढला. त्यामुळे अनेक कंपन्या बंद पडल्या. कामे ठप्प झाली. त्यामुळे उपासमार होण्याच्या भीतीने ही मंडळी तालुक्यात दाखल झाली होती. ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात स्थलांतरित नागरिक असल्याची नोंदी आहेत. मागील काही दिवसांपासून पुणे, मुंबई, गुजरात, या भागातील व्यवहारही सुरू झाले आहेत. अनेक कंपन्या पुन्हा सुरू झाल्या. या कंपन्यांना आता कामगारांचा तुटवडा जाणू लागल्याने तालुक्यातील काही कामगारांना कंपन्याकडून बोलावणे येत आहे. मात्र कोरोनाच्या भीतीने मजूरवर्ग घरीच थांबले बरं? असे पाहायला मिळत आहे.