लग्नाच्या ५ दिवस आधी युवकाचा अपघात; दोन तरुण ठार, एक जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2023 21:15 IST2023-01-16T21:10:11+5:302023-01-16T21:15:22+5:30
एरंडोल : पिंपळकोठा गावानजीकची घटना

लग्नाच्या ५ दिवस आधी युवकाचा अपघात; दोन तरुण ठार, एक जखमी
एरंडोल जि. जळगाव : जळगावहून एरंडोलकडे भरधाव वेगाने जाणारी कार व दुचाकी यांच्यात समोरासमोर धडक झाली. यात दोन जण जागीच ठार तर एक जण गंभीर जखमी झाला. ही घटना पिंपळकोठा (ता. एरंडोल)नजीक सोमवारी सायंकाळी ६.३० वाजेच्या सुमारास घडली.
नितिन जामसिंग पाटील (२१) आणि घन:श्याम भानुदास बडगुजर (२०, दोघे रा. पिंपळकोठा बुद्रुक ता. एरंडोल) अशी मृत तरुणांची नावे आहेत. यात ज्ञानेश्वर गणसिंग पाटील (२२, रा. पिंपळकोठा बुद्रुक) हा पादचारी युवक गंभीर जखमी झाला आहे. कार जळगावहून नाशिककडे भरधाव वेगाने जात होती. या गाडीने नंबर प्लेट नसलेल्या दुचाकीस धडक दिली. यावेळी जि.प.चे माजी सदस्य नानाभाऊ महाजन, अशोक पाटील, राजेंद्र पाटील, मनोज पाटील, हरिभाऊ महाजन, अशोक बडगुजर व इतर ग्रामस्थांनी मदतकार्य केले.
दरम्यान, जखमी ज्ञानेश्वर पाटील यास पुढील उपचारासाठी जळगाव येथे हलविण्यात आले आहे. ज्ञानेश्वर याचा २१ जानेवारीला विवाह होता, अशी माहिती मिळाली.