Accident: धरणगावजवळ भीषण अपघात बीडीओ एकनाथ चौधरी यांचा मृत्यू, पहाटे पाच वाजेची ची घटना!
By चुडामण.बोरसे | Published: November 23, 2022 12:14 PM2022-11-23T12:14:29+5:302022-11-23T12:15:13+5:30
Accident: अमळनेर पंचायत समितीचे सहायक गट विकास अधिकारी व यावल पंचायत समितीचे प्रभारी गट विकास अधिकारी एकनाथ चौधरी यांचा भीषण अपघातातात मृत्यू झाला. ही घटना धरणगावनजीक बुधवारी पहाटे पाच वाजता घडली.
जळगाव - अमळनेर पंचायत समितीचे सहायक गट विकास अधिकारी व यावल पंचायत समितीचे प्रभारी गट विकास अधिकारी एकनाथ चौधरी यांचा भीषण अपघातातात मृत्यू झाला. ही घटना धरणगावनजीक बुधवारी पहाटे पाच वाजता घडली.
ते शासकीय कामासाठी भुसावळहून अमळनेरमार्गे नाशिक जात होते. एकनाथ चौधरी हे चारचाकी वाहनाने (क्र. एमएच १९, डीव्ही ४१९९ ) शासकीय कामासाठी नाशिक जात होते. आज पहाटे पाच वाजेच्या सुमारास धरणगाव अमळनेर रस्त्यावरील भोणे फाट्याजवळ एका ट्रकला त्यांच्या वाहनाने धडक दिली, त्यात त्यांच्या चारचाकी वाहनाचा अक्षरशः चक्काचूर झाला. अपघात एवढा भीषण होता की, त्यात एकनाथ चौधरी हे जागीच ठार झाले तर चालक गंभीर जखमी झाला आहे. विशेष म्हणजे गाडीच्या दोन्ही एअर बॅग उघडूनही त्यांचे प्राण वाचू शकले नाहीत. तेथील नागरिकांनी तात्काळ १०८ ला बोलावले असताना दोघांना धरणगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासले असता, एकनाथ चौधरी यांना मृत घोषित केले. तर चालकाला जळगाव येथे पुढील उपचारसाठी हलविण्यात आले आहे.
एकनाथ चौधरी हे मुळचे चाळीसगाव तालुक्यातील तरवाडे रहिवासी होते. भुसावळ येथे वास्तव्यास होते.त्यांच्या मागे आई, पत्नी,दोन मुले असा परिवार आहे घटनेचे वृत्त कळताच अधिकारी व कर्मचारी यांनी रुग्णालयात गर्दी केली. धरणगाव ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. रुग्णालयाच्या आवारात उपमुख्य कार्यकारी अधिकारी नेहा कुडचे-पवार ,धरणगावचे गटविकास अधिकारी सुशांत पाटील आदी उपस्थित होते.