नशिराबादला अपघाताचा धोका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 04:30 AM2021-03-13T04:30:08+5:302021-03-13T04:30:08+5:30
नशिराबाद : महामार्गाच्या चौपदरीकरणासह पुलाचे काम वेगात सुरू आहे. मात्र, पुलाच्या साईटने भुसावळहून जळगावकडे जात असताना नशिराबादला विडी ...
नशिराबाद : महामार्गाच्या चौपदरीकरणासह पुलाचे काम वेगात सुरू आहे. मात्र, पुलाच्या साईटने भुसावळहून जळगावकडे जात असताना नशिराबादला विडी गोडाऊनजवळ महामार्गाच्या लगत मोठा खड्डा अपघाताला निमंत्रण देत आहे. तिच्या शेजारूनच गटार गेली असल्यामुळे त्या खोलवर भाग अपघाताची दाट शक्यता आहे. तातडीची उपाययोजना व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
नशिराबाद येथे विडी गोडाऊनच्या जवळच महामार्गावरच खाद्यपदार्थांची विक्री करणारे, तसेच रिक्षा यांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते. महामार्गावर मोठ्या प्रमाणावर वाहनांची वर्दळ सुरू असते. सध्या बस त्याच जागेवर थांबत असल्यामुळे प्रवाशांची गर्दी तिथेच असते. काही वेळा तर त्या ठिकाणी छोटे-मोठे अपघात घडून काहींना वादाला सामोरे जावे लागले आहे. उंट विडीजवळ असलेल्या मोठ्या खड्ड्यामुळे अपघाताला निमंत्रण मिळत आहे. त्यासाठी तत्काळ रस्त्याचा भराव टाकण्यात यावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
वाहतुकीची कोंडी सुटणार का?
महामार्गालगत खाद्यपदार्थ यांच्यासह अन्य विक्रेते यांची दुकाने मोठ्या प्रमाणावर आहेत. त्यामुळे या ठिकाणी खरेदी करण्याकरिता नागरिकांची गर्दी होते. हाकेच्या अंतरावर पोलीस स्टेशन आहे. मात्र, येथे सातत्याने वाहतुकीची कोंडी होत असतानाही पोलीस दादांची शिट्टी इथे का वाजत नाही? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
धुळीने झाले बेजार
महामार्ग चौपदरी करण्याच्या ठिकाणी पुलाचे काम सुरू असल्यामुळे परिसरात धूळ मोठ्या प्रमाणावर उडत आहे. त्यामुळे अनेकांना श्वसनाचा त्रास होत आहे. पुलाच्या ठिकाणी पाणी टाकण्यात येते, तसेच आजूबाजूलाही टाकावे अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. त्यामुळे धुळीचे प्रमाण नियंत्रणात येईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.