पत्नीला घ्यायला जात असलेला तरुण अपघातात ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 2, 2020 12:18 PM2020-03-02T12:18:40+5:302020-03-02T12:18:50+5:30
जळगाव : माहेरी गेलेल्या पत्नीला घ्यायला जात असताना अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्याने भाऊसाहेब प्रभाकर कोळी (३०, रा.चांदसर,ता. धरणगाव) ...
जळगाव : माहेरी गेलेल्या पत्नीला घ्यायला जात असताना अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्याने भाऊसाहेब प्रभाकर कोळी (३०, रा.चांदसर,ता. धरणगाव) हा तरुण ठार झाला. हा अपघात रविवारी दुपारी अडीच वाजता महामार्गावर बांभोरीपासून काही अंतरावर असलेल्या मातोश्री ढाब्यासमोर झाला.
भाऊसाहेब याची पत्नी मनिषा ही मुलांसह साकेगाव, ता.भुसावळ येथे माहेरी गेली होती. रविवारी घ्यायला येणार म्हणून त्याने पत्नीला फोन करुन सांगितले होते. दुपारी १ वाजता चांदसर येथून दुचाकीने (क्र.एम.एच. १९ ए.जी.८०४४) निघाला. पाळधी सोडल्यानंतर मातोश्री ढाब्याजवळ मागून येणाऱ्या वाहनाने भाऊसाहेब याला धडक दिली. त्यात भाऊसाहेब दुचाकीसह फेकला गेला.
नागरिकांनी जैन इरिगेशनची रुग्णवाहिका बोलावून तातडीने भाऊसाहेब याला जळगावला हलविले, मात्र रस्त्यातच त्याची प्राणज्योत मालवली. जिल्हा रुग्णालयात डॉक्टरांनी त्याला मृत घोषीत केले. या अपघातात भाऊसाहेब याच्या शरीरावर कुठेही जखमा नाहीत, मात्र उजवा हात पिळला गेला आहे. दरम्यान, मृतदेह सायंकाळपर्यंत पत्नीला अपघाताची माहिती कळविण्यात आली नव्हती.
मोबाईलवरुन पटली ओळख
अपघाताच्यावेळी भाऊसाहेब याची ओळख पटली नव्हती. रुग्णवाहिकेतून काही लोकांनी त्याच्या मोबाईलवरुन संपर्क केला असता तो चांदसरमध्ये लागला. तेव्हा त्याची ओळख पटली. भाऊसाहेब हा मजुरी करायचा. त्याच्या पश्चात आई जिजाबाई, वडील प्रभाकर पोपट कोळी, पत्नी मनिषा, मुलगी वैशाली (७), काजल (३) व मुलगा प्रेम (३) असा परिवार आहे.
अपघाताची मालिका थांबेना
महामार्गावर सातत्याने अपघात होत आहेत. गेल्या महिन्यात याच महामार्गावर तिघांचा बळी गेला. मार्च महिन्याच्या सुुरवातीलाच पुन्हा अपघात होऊन तरुणाचा बळी गेला. खराब रस्ते, साईटपट्या, समांतर रस्ते नसणे आदी कारणांनी अपघातांची संख्या वाढली आहे.