जळगावात अपघात १६ टक्क्यांनी घटले; पण...
By सागर दुबे | Published: April 13, 2023 03:30 PM2023-04-13T15:30:35+5:302023-04-13T15:30:53+5:30
गेल्या काही वर्षांपासून बेशिस्त वृत्ती, बेदरकारपणा, अतिवेग, वाहतूक नियमांचे उल्लंघन या कारणांमुळे जिल्ह्यात अपघातांचे प्रमाण वाढले होते.
जळगाव : जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग, राज्यमार्ग आणि इतर मार्गांवरील वाहतूक कोंडी आणि वाहतूक नियमांचा बोजवारा उडाला असताना गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी जानेवारी ते मार्च या तीन महिन्यांत जीवघेण्या अपघातांच्या संख्येत १६ टक्क्यांनी घट झाल्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन विभागाकडून देण्यात आली आहे. त्याशिवाय जळगाव जिल्ह्यातील अपघातील मृत्यूचेही प्रमाण घटले आहे. मात्र, अपघाताची संख्या जरी घटली असली तरी नागरिकांनी वाहतूकीचे नियम पाळून वाहन चालवावे, असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन विभागाकडून करण्यात आले आहे.
गेल्या काही वर्षांपासून बेशिस्त वृत्ती, बेदरकारपणा, अतिवेग, वाहतूक नियमांचे उल्लंघन या कारणांमुळे जिल्ह्यात अपघातांचे प्रमाण वाढले होते. यात नैसर्गिक कारणांपेक्षा मानवी दोषच अधिक दिसून आहेत. मागील वर्षी जळगाव जिल्ह्यात एकूण ८४३ रस्ते अपघात झाले आहेत. या अपघातांमध्ये ५६४ व्यक्तींचा मृत्यू झाला आहे तर अपघातात जखमी झालेल्यांची संख्या ७१९ इतकी आहे. परंतू, जानेवारी ते मार्च- २०२२ या कालावधीच्या तुलनेत जानेवारी ते मार्च-२०२३ या कालावधीत एकूण अपघातांच्या संख्येत १६ टक्क्यांनी घट झालेले असून अपघातातील मृत्यूची संख्येत १५ टक्क्यांनी घट झालेली पहायला मिळत आहे.
चालकांचा निष्काळजीपणा...
जळगाव जिल्ह्यातील रस्ते अपघातामध्ये प्रामुख्याने दुचाकी, अवजड मालवाहू वाहन व कार यांचा समावेश आहे. सर्वाधिक अपघात चालकाच्या निष्काळजीपणामुळे होत असल्याचे महामार्ग पोलिसांच्या निदर्शनास आले आहे. ज्यामध्ये वेगाने वाहन चालविणे, हेल्मेट न लावणे, सीटबेल्ट न वापरणे, पहाटेच्या वेळी चालकांना डुलकी येत असल्याने अपघात होत आहे. वाहन चालवताना फोनवर बोलणे आणि ओव्हरटेक करण्याच्या कारणामुळेसुद्धा सर्वाधिक अपघात होत असल्याचा उपप्रादेशिक परिवहन विभागाने काढला आहे.
प्रवासी बस चालकांनी मालाची वाहतूक करू नका...
खासगी प्रवासी बस चालकांनी त्यांच्या वाहनातून मालाची वाहतूक करण्यास मनाई करण्यात आली आहे. त्याशिवाय प्रवासी वाहतूक करणा-या वाहन चालकांनी आसन क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी वाहतूक करू नये, अन्यथा कारवाईला सामोरे जावे लागेल, अशा इशारा उपप्रादेशिक परिवहन विभागाने दिला आहे.
ओव्हरटेक करू नका...
महामार्गावर आणि शहरात दुचाकी चालविताना न चुकता हेल्मेट परिधार करावे. सर्व वाहन चालकांनी महामार्गावर ठरवून दिलेल्या वेग मर्यादेमध्ये वाहन चालवावे. लेन बदलवितांना व ओव्हरटेक करताना विशेष काळजी घ्यावी. मुख्यत: ओव्हरटेक करूणे टाळा. तसेच वाहन चालविताना मोबाईलवर बोलणे टाळावे. दुचाकी चालकांनी ट्रीपलसीट वाहन चालवू नये. कार चालकांनी सीटबेल्टचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
ही आहेत नैसर्गिक कारणे
धुके किंवा मुसळधार पाऊस, उष्णतेमुळे टायर फुटणे, अचानक जनावर रस्त्यात आडवे येणे, दरड कोसळणे अशा कारणांमुळे अपघात होतात मात्र याचे प्रमाण कमी असून मानवी चुकाच अधिक आहेत.
सन २०२२
अपघात : ८४३
मृत्यू : ५६४
जखमी : ७१९
मागील वर्षीच्या तुलनेत यंदा...
अपघात घट : १६%
मृत्यूमध्ये घट : १५ %