लक्झरी बसची शिवशाहीला धडक, 1 ठार 25 जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2018 04:47 PM2018-07-14T16:47:23+5:302018-07-14T22:32:31+5:30
एका लक्झरी बसने शिवशाही बसला जोराची धडक दिली. या अपघातात एक जण ठार झाला असून २५ जखमी झाले आहेत. अपघातानंतर लक्झरीचा चालक फरार आहे.
पारोळा, जि.जळगाव : येथील राष्ट्रीय महामार्गावरील तुराटखेडा गावानजीक पारोळ्याहून जळगावकडे जाणारी महामंडळाची शिवशाही बस व अकोल्याहून सुरतला लग्नासाठी जाणारी लक्झरी बस यांच्यात सामोरासमोर धडक होऊन दोन्ही वाहनातील सुमारे २५ जण जखमी झाले असून, योगेश कांतीलाल शाह (वय ४५, रा.अकोला) यांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शनिवारी पहाटे सहाला घडली. जखमींपैकी १० जण गंभीर आहेत.
सूत्रांनुसार, अकोला येथून शाह कुटुंब हे गजानन लक्झरी (क्रमांक एमएच-३०-एए-७५६४)ने सुरत येथे लग्न समारंभासाठी जात होते. याच वेळी पारोळ्याकडून जळगावकडे जाणारी महामंडळाची शिवशाही वातानुकूलित बस (क्रमांक एमएच-१८-बीजी-१५८५) यांच्यात सकाळी सहाला भीषण अपघात झाला. या अपघातात शाह कुटुंबातील नीलेश मांडविया, हितेश ईश्वर शाह, साकरचंद प्रेमचंद शाह, ईश्वर साकरचंद शाह, शशीभाई शाह, भारत ईश्वर शाह, मिटाबेन ईश्वर शाह, निटाबेन शाह, एकता मोंटू शाह, जयंतीबेन शाह, काजल हितेश शाह, दिनल शाह, ध्रुवी शाह, पार्थ भरत शाह, जयमन योगेश शाह, चार्मी योगेश शाह, बिना योगेश शाह हे गंभीर जखमी, तर इतर आठ जण किरकोळ जखमी झाले. तसेच शिवशाही बसमधील १० जण गंभीर जखमी रुग्णांना एरंडोल येथे घटनास्थळावरून हलविले. सर्व जखमींना जळगाव येथे हलविण्यात आले आहे.
या अपघातानंतर शाह परिवाराच्या नातेवाईकांनी कुटीर रुग्णालयात गर्दी करून एकच आक्रोश केला.
यातील मयत योगेश शाह हे अकोला जनता बँकेचे चेअरमन असल्याचे नातेवाईकांनी सांगितले तर त्यांची पत्नी बिना शाह व मुलगा जयमन, मुलगी चार्मी हे आक्रोश करीत मेरे पती कहां है, मेरे पापा कहां है, असे ओरडत होते, परंतु त्यांचा कुटुंबप्रमुख या अपघातात मयत झाल्याचे त्यांना सांगितल्यावर त्यांनी प्रचंड आक्रोश केला. शाह कुटुंब हे सुरत येथे रविवारी भाऊबंदकीत लग्न असल्याने रात्री अकोला येथून हे निघाले होते. त्यांच्यावर क्रूर काळाने पारोळ्याजवळ घाला घातला. या अपघातामुळे शाह कुटुंब हे फारच भेदरलेल्या अवस्थेत होते.
पहाटे अपघात होताच तुराटखेडा, मराठखेडा, सावखेडा होळ येथील तरुण मंडळींनी मदत करीत एरंडोल, पारोळा, कासोदा, बहादरपूर येथील १०८ रुग्णवाहिकांना बोलवले. बसेसच्या काचा फोडून जखमींना बाहेर काढले आणि रुग्णवाहिकेत रुग्णांना एरंडोल, पारोळा येथे हलविले.