धर्मदाय आयुक्त कार्यालयातील लेखापालाचा मृतदेह आढळला जायकवाडीच्या जलाशयात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 27, 2020 10:45 PM2020-01-27T22:45:53+5:302020-01-27T22:46:09+5:30
आत्महत्या कि बुडून मृत्यू? : घर व कार्यालयात आढळल्या चिठ्ठ्या
जळगाव : धमार्दाय आयुक्त कार्यालयातील लेखापाल म्हणून कार्यरत असलेल्या हेमंत प्रभू सोनार (४० रा. शिव कॉलनी, जळगाव, मुळ रा.धुळे) यांचा मृतदेह सोमवारी दुपारी २ वाजता पैठण जवळील जायकवाडीच्या जलाशयात तरंगताना आढळून आला. याचवेळी संदीप मधुकर देशमुख, शेवगाव यांचाही मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, सोनार यांच्या घरात व कार्यालयात चिठ्ठया आढळून आल्या असून त्यात कार्यालयात कामाचा ताण व सहकार्य मिळत नाही असा उल्लेख आहे, त्यामुळे सोनार यांनी आत्महत्या केली असावी अशीही शक्यता वर्तविली जात आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हेमंत सोनार हे अचानक घरातून निघून गेल्याने प्रजासत्ताकदिनी सायंकाळी उशीरा रामानंदनगर पोलिसात बेपत्ता झाल्याची नोंद झाली होती. सोमवारी दुपारी जायकवाडी धरणाच्या १४ क्रमांकाच्या दरवाजा व धरणाच्या ‘व्ह्यू पॉंईट’ जवळ अशा दोन ठिकाणी जलाशयात अज्ञात व्यक्तींचे मृतदेह पाण्यावर तरंगत असल्याचे आढळून आले. या बाबत धरण नियंत्रण कक्षातून पैठण पोलिसांना खबर देण्यात आली. पोलीस निरीक्षक भगीरथ देशमुख, पोलीस कॉन्स्टेबल भिमलाल राठोड, किशोर शिंदे गणेश कुलट आदींनी घटनास्थळी जाऊन व्ह्यू पॉंईट परिसरात जलाशयात असलेला मृतदेह स्थानिक तरूणांच्या मदतीने पाण्याबाहेर काढला. मृतदेहाच्या खिशात असलेल्या ओळखपत्रावरून हेमंतकुमार प्रभू सोनार यांची ओळख पटली.
बाहेरुन फिरुन येतो, सांगत पडले घराबाहेर
हेंमत सोनार हे पत्नी स्वाती, मुले भावेश व अक्षता या कुटुंबासह वास्तव्यास आहे. ते मूळ धुळे येथील रहिवासी आहेत. सहा महिन्यांपूर्वीच ते पदोन्नतीवर जळगाव येथील धमार्दाय आयुक्त कार्यालयात रुजू झाले. शिव कॉलनीतील पारिजात अपार्टमेंट ब्लॉक नं ५७ येथे राहत होते. २६ जानेवारी रोजी सायंकाळी ४.३० वाजता हेमंत सोनार हे पत्नीला ‘बाहेरुन फिरुन येतो’, असे सांगून निघाले. यानंतर रात्री उशीरा परत आले नाही. पत्नी मुलांसह रिक्षातून त्यांचा सर्वत्र शोध घेतला. मात्र ते मिळून न आल्याने नातेवाईकांना याबाबत माहिती दिली. नातेवाईकांसह पत्नी स्वाती यांनी रामानंदनगर पोलीस ठाणे गाठले. रात्री साडे दहा वाजेच्या सुमारास पती हेमंत सोनार हे बेपत्ता असल्याची माहिती दिली.
पैठणला जायकवाडी धरणावर मृतदेह सापडला
सोनार राहत असलेल्या परिसरातील काही तरुण सोमवारीही त्यांचा शोध घेत होते. मात्र ते मिळून आले नाही. दुपारी २ वाजेच्या सुमारास पैठण पोलिसांनी सोनार यांच्या पत्नीशी मोबाईलवर संपर्क साधला. ओळखपत्रचा फोटो व्हॉटसअॅॅपवर पाठविल्यानंतर पत्नीने त्यांना ओळखले. मृत्यूची माहिती मिळताच पत्नीसह मुलांनी हंबरडा फोडला. माहितीनुसार नातेवाईक मृतदेह घेण्यासाठी पैठणकडे रवाना झाले.
कार्यालयीन कामाच्या तणावातून आत्महत्या?
हेमंत सोनार हे घराबाहेर पडतांना त्यांनी मोबाईल, पाकीट, तसेच एटीएमकार्ड घरीच ठेवले होेते. रात्री घरात शोध घेत असतांना कुटुंबियांना सोनार यांनी लिहून ठेवलेली दोन पानांची चिठ्ठी मिळून आली. यात कार्यालयीन कामाचा तणावात होता, अधिकारी व सहकारी कर्मचारीही सहकार्य करत नव्हते, असे सांगत मी साधा होतो म्हणून मला त्रास झाला असल्याचे नमूद होते. तर कार्यालयातही सोनार यांनी लिहून ठेवलेली चार पानांची चिठ्ठी मिळून आली असून ती कर्मचाऱ्यांनी पोलिसात जमा केल्याचे समजते.