बेजबाबदार व्यवस्थापनामुळे शिक्षकाचा बळी गेल्याचा आरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2019 04:15 PM2019-04-17T16:15:59+5:302019-04-17T16:17:25+5:30
निवडणूक प्रशिक्षणात सुविधांचा अभाव
अमळनेर : निवडणूक प्रशिक्षण काळातील शिक्षकाचा गेलेला बळी हा बेजबाबदार व्यवस्थापनामुळे गेल्याचा आरोप शिक्षक संघटनांनी केला. उन्हाच्या तीव्रतेचा व मानवी शरीराचा विचार न करता निव्वळ सरकारी काम पार पाडण्याच्या वृत्तीमुळे हा प्रकार घडल्याचे शिक्षकांचे म्हणणे आहे
भर उन्हाळ्यात लोकसभा निवडणूक होत असून मतदान अधिकारी, कर्मचारी यांना प्रशिक्षण दिले जात आहे. मात्र निवडणूक पारदर्शी करण्यासाठी फक्त शिक्षक, ग्रामसेवक यांच्यावर विश्वास नसल्याने त्यांचे तालुके बदलवून त्यांना दुसऱ्या तालुक्यात निवडणूक कर्तव्यावर नेमले गेले आहे. मात्र एकाच जिल्ह्यात वेगवेगळ्या तालुक्यात प्रशिक्षण व्यवस्था भिन्न असल्याचे कर्मचाऱ्यांच्या अनुभवास आले असून बेजबाबदार व्यवस्थेमुळेच कळमसºयाचे शिक्षक अंबादास चौधरी यांचा मृत्यू झाल्याचा आरोप प्रशिक्षणार्थींनी केला आहे.
चाळीसगाव येथे शिक्षकांचे प्रशिक्षण पत्र्याच्या गोदामात मंडपाखाली घेण्यात आले पुरेशा पाण्याची व्यवस्था नाही, हवेची व्यवस्था नाही, जेवण व नाश्त्याची सुविधा नाही त्यामुळे ५० ते १०० किमी अंतरावरून आलेले कर्मचारी उन्हाने बेजार झाले. जीव गुदमरल्यासारखा झाला. पाणी नाही , भुकेने व्याकुळ झाल्याने काहींना चक्कर आली. त्यात अंबादास चौधरी हे पायी बसस्टॅण्डकडे परतीला निघाले अन चक्कर येऊन पडताच जागीच मयत झाले. त्याच वेळी अमळनेर येथील प्रशिक्षण हे उन्हाचा विचार करून वातानुकूलित शिवाजी नाट्यगृहात घेण्यात आले. प्रांताधिकारी सिमा आहिरे , तहसीलदार ज्योती देवरे दोन्ही अधिकारी महिला असतानाही कर्मचार्यांना पुरेशा पाण्याची व्यवस्था , भोजन, दोन वेळा मठ्ठा आदी व्यवस्था तसेच रुग्णवाहिकाची सोय करण्यात आली होती तर पाचोरा येथे खुल्या मैदानात मंडपात व्यवस्था करण्यात आली होती. अपूर्ण फॅन व मोजके कुलर यामुळे उष्णता होतीच. पाण्याची व्यवस्था होती पण भोजन नाही तसेच इतर काही ठिकाणी पाणी पुरेसे होते तर भोजन नव्हते त्यामुळे उन्हात लाम्ब अंतरावर जावे लागले , काही ठिकाणी चहाच पाजण्यात आला काही ठिकाणी दोन तास तर काही ठिकाणी चार तास प्रशिक्षण देण्यात आले एकाच निवडणुकीत एकाच जिल्ह्यात भिन्न व्यवस्थापनामुळे कर्मचाºयांच्या जीवावर बेतत असल्याचा आरोप शिक्षक संघटनांनी केला आहे. त्यात अधिकारी कायद्याचा बडगा दाखवत असल्याने काहींनी भीती घेतली होती.
स्थानिक तालुक्यात नेमणुकीची मागणी
२३ एप्रिल पर्यंत उन्हाची तीव्रता वाढणार असून तब्बल १२ तास एकाच खोलीत बसून मतदान प्रक्रिया राबवावी लागणार असल्याने कर्मचाºयांचे हाल होणार आहेत. त्यामुळे प्रशासनाने मानवी शरीराची क्षमता ओळखून व्यवस्था करण्याची मागणी शिक्षक भारती , माध्यमिक शिक्षक संघ , टी डी एफ संघटनांनी, मुख्याध्यापक संघटनांनी केली असून पुढील निवडणुकात कर्मचाºयांना महसूल कर्मचाºयांप्रमाणेच स्थानिक तालुक्यात निवडणूक कर्तव्यावर नेमण्याची मागणीही केली आहे.