जळगावच्या पोलीस भरतीत गैरप्रकार करणा-या फरार आरोपीस अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2018 10:27 PM2018-06-12T22:27:17+5:302018-06-12T22:27:17+5:30
पोलीस भरतीच्या लेखी परीक्षेसाठी कॉडलेस इअर फोनचा गैरवापर प्रकरणातील फरार आरोपी रतन प्रेमसिंग बहुरे (रा.जोडवाडी, पो.कचनेर, ता.जि.औरंगाबाद) याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मंगळवारी त्याच्या गावावरुन अटक केली.
आॅनलाईन लोकमत
जळगाव दि,१२ : पोलीस भरतीच्या लेखी परीक्षेसाठी कॉडलेस इअर फोनचा गैरवापर प्रकरणातील फरार आरोपी रतन प्रेमसिंग बहुरे (रा.जोडवाडी, पो.कचनेर, ता.जि.औरंगाबाद) याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मंगळवारी त्याच्या गावावरुन अटक केली.
त्याच्याच गावातील मदन महाजन डेडवाल याला कॉडलेस इअर फोनचा वापर करताना १९ एप्रिल रोजी पोलिसांनी कवायत मैदानावरच पकडले होते. याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, पोलीस भरती प्रक्रियेचा अंतिम टप्पा म्हणून १९ एप्रिल रोजी लेखी परीक्षा होती. पेपर सुरु होण्यापूर्वी मैदानावर प्रत्येक उमेदवारांची अंगझडती घेतल्यानंतर डोअर फ्रेम मेटल डिटेक्टरमधून तपासणी करताना मदन पकडला गेला होता. रतन हा बाहेर होता. मदनला पकडल्यानंतर अधिकाºयांचे सर्व बोलणे रतनला ऐकू येत होते. मदनचे बींग फुटल्याचे लक्षात आल्यानंतर त्याने तेथून पळ काढला होता. त्यादिवसापासून पोलीस त्याच्या मागावर होते.
जाडेवाडीत धडकले पथक
रतन हा जाडेवाडीत परतल्याची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील कुराडे यांनी सहायक निरीक्षक रवींद्र बागुल, हेडकॉन्स्टेबल रवींद्र पाटील, विकास वाघ, विनोद पाटील, गफूर तडवी व दत्तात्रय बडगुजर यांचे पथक तयार केले होते. या पथकाने मंगळवारी दुपारी त्याला घरुनच ताब्यात घेतले. दरम्यान, या संशयिताला ताब्यात घ्यावे म्हणून पोलीस अधीक्षक दत्तात्रय कराळे यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता.
सैन्य दलाची नोकरी सोडली
रतन याची पोलिसांनी कुंडली काढली असता तो सैन्य दलात नोकरीला होता. पाच वर्र्षे नोकरी केल्यानंतर सिमा भागावर ड्युटी लागल्याने भीतीपोटी त्याने ही नोकरी सोडली. त्यामुळे तो घरीच होता. सध्या कोणताच कामधंदा करीत नव्हता. त्याने जळगावसह अन्य शहरात देखील पोलीस भरतीत असा प्रकार केला असावा असा संशय पोलीस निरीक्षक कुराडे यांनी व्यक्त केला आहे.