पोलिसांना झोपेत ठेवून आरोपींचे पहाटे पलायन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2020 12:23 PM2020-08-20T12:23:22+5:302020-08-20T12:24:47+5:30
हरियाणातील घटना : जिल्हा पेठ पोलिसांची नामुष्की
जळगाव : शिव कॉलनी उड्डाणपुलाजवळील स्टेट बॅँकेचे एटीएम फोडणाऱ्या निसार शफुर सैफी (३८) आणि त्याचा लहान भाऊ इरफान शफुर सैफी (२९, रा. पलवल, हरियाणा) या दोघांनी पोलिसांना झोपेत ठेवून बुधवारी पहाटे पाच वाजता हरियाणातील बदरपूर येथून पलायन केल्याची घटना घडली असून यामुळे एकच खळबळ उडाली आहे. कारागृहातून तीन बंद्यांनी पलायन केल्यानंतर आता जिल्हा पेठ पोलिसांच्या तावडीतून दोन आरोपींनी पलायन केल्याचा प्रकार उघड झाला.
महामार्गाला लागून असलेले एटीएम चोरट्यांनी गॅस कटरने कापून त्यातील १४ लाख ४१ हजार ५०० रुपयांची रोकड लांबविल्याची घटना १२ जुलै रोजी उघडकीस आली होती. याप्रकरणी जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.
दरम्यान, या गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार खुर्शीद मदारी सैफी (रा.अंघोला, ता.पलवल, हरियाणा) हा हरियाणा पोलिसांच्या रेकॉर्डवर असल्याने त्याच्या शोधात हरियाणा पोलिसांनी सापळा लावून खुर्शीदला पकडण्याचा प्रयत्न केला असता त्याने आधीच पलायन केले होते तर निसार व त्याचा भाऊ इरफान हे दोघं पोलिसांच्या हाती लागले होते. त्यांनी चौकशीत जळगावाला एटीएम फोडल्याची कबुली दिली होती. त्यामुळे जिल्हा पेठ पोलिसांनी या दोघांना फरीदाबादमधील निमका कारागृहातून हस्तांतर करुन ५ आॅगस्टला जळगावात आणले होते. तेव्हापासून ते पोलीस कोठडीत होते.
हॉटेलमध्ये ठेवणे पडले महाग
जळगावच्या गुन्ह्यातील तपास पूर्ण झाल्यानंतर या दोनही आरोपींना परत हरियाणातील फरीदाबादमधील निमका कारागृहात पोहचविण्यासाठी जिल्हा पेठ पोलीस स्टेशनचे शिवाजी पवार, प्रशांत जाधव, हेमंत तायडे व शेखर पाटील हे चार कर्मचारी गेले होते. मंगळवारी सायंकाळी कारागृहात हजर करण्यासाठी गेले असता तेथील प्रशासनाने या आरोपींची कोविडची चाचणी करण्याचा सल्ला पोलिसांना दिला. रात्री चाचणी शक्य नसल्याने बुधवारी सकाळी चाचणी करण्याचा निर्णय घेऊन या आरोपींना घेऊन पोलीस एका हॉटेलमध्ये गेले. तेथे रात्री ११.३० वाजता खोलीत झोपले असता पहाटे पाच वाजता आरोपी जागेवर नसल्याचे उघड होताच पोलिसांची झोप उडाली. सर्वत्र शोधाशोध केल्यानंतर त्यांनी जिल्हा पेठचे निरीक्षक अकबर पटेल यांना झाल्या प्रकाराची माहिती दिली. दरम्यान, या आरोपींना नियमानुसार पोलीस ठाण्याच्या कोठडीत ठेवणे अपेक्षित होते, मात्र पोलिसांनी ती चूक केली अन् तेथेच घात झाला. दरम्यान, याप्रकरणी हरियाणातील बदरपूर पोलीस ठाण्यात माहिती देण्यात आली आहे.
तिसरा आरोपी मिळण्याऐवजी होते तेही पळाले
एटीएम फोडल्याच्या गुन्ह्यात या दोघांना हरियाणा कारागृहातून हस्तांतर केल्यानंतर पोलीस कोठडीत त्यांच्याकडून गुन्ह्याची उकल, रोकड हस्तगत व तिसरा आरोपी तथा मुख्य संशयित खुर्शीद याचा शोध घेणे अपेक्षित होते, मात्र यापैकी कोणतेच काम जिल्हा पेठ पोलिसांनी केले नाही, उलट जे आरोपी हाती लागले होते, त्यांना कारागृहात हजर करण्याआधीच पलायनाची संधी मिळाली. कोरोनाची चाचणी करायला सांगितल्यामुळे रात्री त्यांना कारागृहात घेतले नाही, म्हणून ही घटना घडल्याचे पोलीस निरीक्षक अकबर पटेल यांनी सांगितले. जळगावला असताना या आरोपींकडून पोलिसांना कोणतीच माहिती मिळाली नाही. या दोघांना कारागृहात दाखल केल्यानंतर मुख्य आरोपीचा शोध घेतला जाणार होता, असेही पटेल यांनी सांगितले.दोघांवर याआधी एकही गुन्हा नव्हता, ते सराईत नव्हते म्हणून कि काय पोलीस गाफिल राहिले आणि त्यात ही घटना घडली.
नियमानुसार आरोपींना पोलीस ठाण्याच्या कोठडीत ठेवणे अपेक्षित होते. हॉटेलमध्ये थांबणे चूकच आहे. याबाबत पोलीस निरीक्षकांना चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले असून चौकशी अहवाल आल्यावर दोषी असलेल्या कर्मचाऱ्यांवर कारवाई केली जाईल.
-डॉ.पंजाबराव उगले, पोलीस अधीक्षक