खुनातील आरोपीने कपडे काढून मांडला जळगाव ‘सिव्हील हॉस्पिटल’ मध्ये ठिय्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2019 12:26 PM2019-08-30T12:26:29+5:302019-08-30T12:26:50+5:30
उपचार व तपासणीची सुविधा नसल्याने संताप
जळगाव : घशातील त्रासामुळे शस्त्रक्रिया करावी लागणार असताना ती सुविधा येथील शासकीय वैद्यकिय महाविद्यालय व रुग्णालयात नसल्याने खुनाच्या गुन्ह्यात कारागृहात असलेल्या सचिन गुमानसिंग जाधव (४१) याने अंगातील शर्ट काढून रुग्णालयाच्या आवारात ठिय्या मांडला. यावेळी बंदोबस्तावर असलेले पोलीस व रुग्णालयातील डॉक्टरांना चांगलाच घाम फुटला होता.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सचिन जाधव, आसिफ बेग असलम बेग (२३) व मनिष भागवत मोरे हे तिघं जण कारागृहात वेगवेगळ्या गुन्ह्यात आहेत. या तिघांना पोलिसांनी कारागृहातून गुरुवारी सकाळी शासकीय रुग्णालयात आणले.
सचिन याच्या घशात त्रास असल्याने त्यावर शस्त्रक्रिया करावी लागणार आहे, त्यासाठी तपासणीचे यंत्र या रुग्णालयात नाही, त्यामुळे औरंगाबाद किंवा मुंबई, पुणे येथेच त्याच्यावर उपचार करावे लागणार आहेत. येथे आणूनही तपासणी होत नसल्याने सचिन याने संताप व्यक्त केला. रूग्णालयाच्या इमारतीच्या प्रवेशव्दाराबाहेर ठिय्या मांडला. यावेळी त्याने अंगावरील शर्ट व पॅँटही काढून फेकले.
आमच्याकडे कोणी चांगल्या नजरेने बघत नाहीत
आसिफ बेग असलम बेग (२३) हा त्वचेच्या आजाराने ग्रस्त आहे. हा आजार नियंत्रणात येण्याऐवजी वाढत आहे. मी काय यातना भोगतोय हे मलाच माहीत. आम्ही कैदी असलो तरी शेवटी माणसे आहेत. परंतु आमच्याकडे कोणी चांगल्या नजरेने बघत नाहीत असे सांगत आसिफ याने संताप व्यक्त केला. तपासणी व उपचार होऊ न शकल्याने पुन्हा आम्हाला उपचारासाठी आणले जाणार का? हे आम्हीही सांगू शकत नाही. कारण कारागृहात क्षमतेपेक्षा जास्त बंदीवान असून आजारी रूग्णांना रूग्णालयात लवकर आणले जात नाही, त्यामुळे आम्हाला अशाच यातना सहनच कराव्या लागतात, असे सांगून तिघांना ठाण मांडले. पोलिसांनी त्यांची समजूत घातली.
पोलिसांनी कक्ष क्रमांक एकमधील वैद्यकीय अधिकाऱ्यांकडे सचिन जाधव याला नेले. त्यांनी कारागृह रजिष्टरमध्ये या तिघांना रुग्णालयात हजर करावे,असे नमूद केले. घशात त्रास होत असल्याने उपचार व निदान करण्यात यावे, असे पत्र बंदीवान सचिन याने जिल्हा सत्र न्यायाधीश यांना दिले होते. त्यांनी या पत्राची दखल घेऊन तात्काळ बंदीवानाला उपचारासाठी रूग्णालयात न्यावे,असे आदेश केले होते,त्यानुसार त्याला रूग्णालयात पोलिसांनी हजर केले होते.परंतु तरीही त्याच्यावर वेळेअभावी उपचार होऊ शकले नाहीत.
वैद्यकिय महाविद्यालय व रुग्णालयात व्यवस्थित उपचार मिळत नसल्याने आजारी कैद्यांना त्रास सहन करावा लागत आहे. या प्रकाराला वैतागलेल्या कैद्याने तर थेट कपडे काढूनच रुग्णालयाच्या आवारात ठिय्या मांडला. त्यामुळे पोलिसांची चांगलीच धावपळ उडाली.