सोने तस्करी करणाऱ्या आरोपीस कारावास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2020 10:06 PM2020-09-22T22:06:36+5:302020-09-22T22:07:12+5:30
भुसावळ न्यायालयाचा निकाल
भुसावळ: पाच वर्षांपूर्वी कलकत्ता ते मुंबई ज्ञानेश्वरी एक्सप्रेसने ८ किलो सोन्याची तस्करी करणाºया इसमास रेल्वे कोर्टाने एक वर्षाचा कारावास व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे.
आरोपी देवाग जयंत शहा रा. (नालासोपारा, मुंबई) हा ज्ञानेश्वरी एक्सप्रेस ने बेकायदेशीररित्या ८ किलो सोने घेऊन १ जानेवारी २०१५ रोजी कोलकत्ता ते मुंबई जात असल्या बाबतची गुप्त माहिती मिळाल्याने, रेल्वे पोलिसांनी सापळा रचून शहा यास अटक केली होती. आजपावेतो रेल्वे कोर्टात याबाबत केस सुरू होती. २२ सप्टेंबर २०२० रोजी न्यायाधीश हरिभाऊ देशिंगे यांनी आरोपीस शिक्षा सुनावली आहे. दरम्यान आरोपी शहा याच्याकडून अॅड. आर.एम. यादव व वैशाली साळवे यांनी बाजू मांडली असता आरोपीस दहा हजाराच्या जामिनावर अपील दाखल करण्यासाठी तीस दिवसाची मुदत देण्यात आली आहे..
लोहमार्ग पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक दिनकर डंबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली अशोक लांडगे, दुर्योधन तायडे यांनी कागदपत्रांची कोर्टात पूर्तता केली.
सरकारतर्फे अॅड. राकेश चौधरी व पैरवी अधिकारी दिवान सिंह राजपूत यांनी काम बघितले.