आरोपी सुमित जोशीचे वाहन केले जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2019 09:40 PM2019-04-06T21:40:24+5:302019-04-06T21:41:35+5:30
चांदणे खून प्रकरण : पोलिसांचा तपास ‘जैसे थे’, कुटुंबियांना न्यायाची प्रतीक्षा
पहूर, ता. जामनेर : वाकडी येथील ग्रा.पं.सदस्य विनोद चांदणे यांच्या खून प्रकरणात पोलिसांनी आरोपी सुमित जोशी यांचे चारचाकी वाहन जप्त केले आहे.
दरम्यान, खून प्रकरणाात वापरण्यात आलेली चारचाकी जप्त केली असली तरी तिचा मूळ मालक कोण याचा तपास सध्या पोलीस करीत आहेत. या खून प्र्रकरणी चांदणे कुटुंबियांकडून शासनाकडे न्यायाची प्रतीक्षा केली जात आहे.
विनोद चांदणे यांचा घातपात करण्यासाठी वापरण्यात आलेली चारचाकी पोलिसांनी आरोपी महेंद्र राजपूतच्या घरून यापूर्वी जप्त केली आहे. ही चारचाकी महेंद्रने विकत घेतली असली तरी त्याच्या नावावर ती नाही. त्यामुळे या चारचाकीचा जामनेरातील मुळमालक कोण? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. याचा तपास पोलीस करीत आहे. पोलिसांच्या तपासाकडे पहूर व परिसरातील लोकांचे लक्ष लागले आहे. आरोपी राजपूत याने जामनेरातून ३० हजार किमंतीची मुंबई पासिंगची जुनी कार विकत घेतली. शेळगावातील दोन जण तसेच प्रदीप व महेंद्र अशा चार जणांनी भागीदारीत ही चारचाकी जामनेर येथून घेतली आहे. पण या चौघांपैकी एकाच्याही नावावर ही चारचाकी नाही. मुळमालकाच्या नावावर ही कार असल्याचे पोलीस तपासात समोर येत आहे. त्यामुळे जामनेरातील कारचा मुळमालक कोण याकडे लक्ष वेधले गेले आहे. याच कारमधून विनोदच्या मृतदेहाची विल्हेवाट लावली गेलीे.
महेंद्र राजपूतला ला भेटण्यासाठी बोदवड रोडवर जातांना सुमीत जोशी (एम. एच. १९ -सी. एच. ४०००) हे वाहन घेऊन गेला होता. पोलिसांनी हे वाहन शनिवारी ताब्यात घेऊन जप्त केले आहे. आरोपी सुमीत जोशी, प्रदीप परदेशी व योगेश सोनार हे पोलीस कोठडीत असून तपास ‘जैसे थै’ असल्याचे सांगण्यात आले आहे. सोमवारी यांची पोलीस कोठडी संपत असल्याने तिघांना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. त्यामुळे न्यायालयाच्या निकालाकडे लक्ष लागुन आहे. मुख्य संशयित चंद्रशेखर वाणी, महेंद्र राजपूत नामदार तडवी व विनोद देशमुख हे न्यायालयीन कोठडीत असल्याने तपासातील मुख्य सुत्रधार तपासात निष्पन्न झालेला नाही. सुमीत संशयाच्या भोवऱ्यात असला तरी त्याच्याकडून काहीच माहिती समोर येत नाही. त्यामुळे सोमवारी जर सुमीत व अन्य साथीदारांना न्यायालयीन कोठडी मिळाली तर विनोद चांदणे यांच्या घातपाताचा तपास संपुष्टात येईल. एकणच पोलिसांच्या कार्यपध्दती विषयी संशय असल्याची चर्चा आहे.