सावद्यातील मद्य चोरीप्रकरणात फिर्यादीच निघाला आरोपी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 2, 2020 09:02 PM2020-05-02T21:02:25+5:302020-05-02T21:06:46+5:30
हिना पॅलेस बिअर बार परमिट रूममधील मद्य चोरी प्रकरणाने वेगळेच वळण घेतले असून, यातील फिर्यादी हाच आरोपी म्हणून चौकशीत पुढे आला आहे.
सावदा, ता.रावेर, जि.जळगाव : येथील हिना पॅलेस बिअर बार परमिट रूममधील मद्य चोरी प्रकरणाने वेगळेच वळण घेतले असून, यातील फिर्यादी हाच आरोपी म्हणून चौकशीत पुढे आला आहे. त्याच्यासह एकूण सात आरोपींना पोलिसांनी अटक केली असून, या फिर्यादी आरोपीचे नाव मॅनेजर कृष्णा सुधाकर कोष्टी आहे.
लॉकडाऊनच्या काळात या परमिट रूममधील पाच लाखाच्या जवळपास विदेशी मद्य बियरच्या बाटल्या विकल्याची कबुली आरोपींनी दिली आहे.
या मद्य बाटल्यांची अवैध बाजारात १५ ते २० लाखात विक्री झाल्याचा अंदाज आहे. याप्रकरणी सावदा पोलिसांनी परमिट रूमचा मॅनेजर कृष्णा सुधाकर कोष्टी, वेटर पुरुषोत्तम शिवाजी देवकर यांच्या चौकशीवरून योगीराज लक्ष्मण भंगाळे, गोविंदा घनश्याम भंगाळे, तुषार वसंत पाटील, मयूर हेमचंद्र बराटे, शेख जाबीर शेख खलील सर्व रा. सावदा यांना अटक केली असून, त्यांना ४ मेपर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली आहे.
वाघोदा रस्त्यावरील हॉटेल हिना परमिट रूममध्ये २९च्या मध्यरात्री हॉटेलमधील चार लाख ६७ हजार ४०० रुपयांच्या विविध विदेशी मद्याच्या तसेच बियरच्या बाटल्या हॉटेलचा मागील दरवाजा तोडून चोरी झाल्याची तक्रार मॅनेजर कोष्टी यांनी दिली होती. मात्र पोलिसांच्या चौकशीत कृष्णा कोष्टी व त्याचा साथीदार वेटर पुरुषोत्तम देवकर यांनी लॉकडाऊन काळात हॉटेलमधील मद्याचा साठा अवैधरित्या विकला होता. राज्य उत्पादन शुल्क विभागाने साठ्याची तपासणी केल्यास आपले पितळ उघडे पडेल, या भीतीने दोघांनी चोरीचा बनाव केला होता. मात्र पोलिसी खाक्यासमोर दोघांनीच इतर पाच दोघांच्या मदतीने पाच लाखाच्या मद्याची विल्हेवाट लावण्याची प्रथम दर्शनी माहिती समोर आल्याचे सपोनि राहुल वाघ यांनी सांगत आरोपी वाढण्याची शक्यताही वर्तविली आहे.
दरम्यान, सावदा तसेच फैजपूर मध्ये लॉकडाऊन काळात मोठ्या प्रमाणावर देशी विदेशी मद्याची विक्री झाली आहे. मद्याची दुकाने सील झाल्यावरसुद्धा मद्य विक्री झाली आहे. राज्य उत्पादन शुल्क, पोलिसांनी याची गांभीर्याने चौकशी करावी, अशी मागणी होत आहे.
फैजपूर येथे ४ एप्रिल रोजी २०० बाटल्या असलेले दोन देशी मद्याच्या खोके पोलिसांनी कारवाई करत एकास अटक केली होती. दरम्यान हे दारूचे खोके कुठल्या दुकानातून आले हे त्या बाटल्यांच्या बॅच नंबरवरून तसेच आरोपींच्या जबाबातून स्पष्ट होऊ शकते. त्याची चौकशी राज्य उत्पादन शुल्क विभागाने करावी, अशी मागणी होत आहे.