आजोळातील संस्काराच्या शिदोरीने गाठला यशाचा पल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 7, 2018 08:36 PM2018-10-07T20:36:08+5:302018-10-07T20:41:21+5:30
अनिता दाते - केळकर
जळगाव : जळगाव शहराशी माझे बालपणापासून ऋणानूबंध असून आजोळ असलेल्या या शहरातूनच मला संस्कार मिळत गेले व या शिदोरीच्या जोरावरच जीवनात यशस्वी झाल्याचे स्पष्ट मत नाट्य अभिनेत्री अनिता दाते - केळकर यांनी प्रकट मुलाखतीद्वारे व्यक्त केले.
केशवस्मृती प्रतिष्ठान संचालित ललित कला अकादमीच्या माध्यमातून भुलाबाई महोत्सवाचे आयोजन रविवारी आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवाच्या समारोप प्रसंगी अनिता दाते -केळकर यांची अपर्णा महाशब्दे यांनी प्रकट मुलाखत घेतली. त्या वेळी बोलताना जळगावविषयीच्या आठवणींना उजाळा देत नाट्यक्षेत्रातील प्रवासाचे वर्णन केले. सोबतच त्यांनी महिलांना व तरुणींना यशाचे मंत्रही दिले.
कथ्थक पाठोपाठ आवडीने नाट्यक्षेत्राकडे वळले
आपल्या नाट्य क्षेत्रातील पदार्पणाबाबत बोलताना अनिता म्हणाल्या की, मला लहानपणापासून कथ्थक शिकत होते. त्यानंतर वडील नाट्यक्षेत्रात असले तरी त्यांनी कधी माझ्याबाबत शिफारस केली नाही. मात्र मला आवड असल्याने मी इकडे वळले व यशस्वी झाल्याचे त्यांनी नमूद केले.
सर्व कलांचा संगम म्हणजे नाट्यकला
आपल्या मुलांना काही येत नाही म्हणून त्यांना नाटकात पाठवू नका, तर त्यांना सर्वच क्षेत्रात प्रावीण्य असेल तरच त्यांना नाट्यक्षेत्रात पाठवा. कारण नाट्य क्षेत्र हे सर्व कलांचा संगम असून यात यशासाठी सर्वक्षेत्राचे ज्ञान आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. या वेळी त्यांनी रामायण, महाभारत या मालिकांसह त्यांच्या राधिका या भूमिकेविषयीदेखील काही उदाहरणे दिली.
समाजाचे देणे लागतो
समाज आहे म्हणून आपण आहे, असे सांगून त्यांनी सामाजिक जबाबदारीचाही संदेश दिला. आपण पाणी फाउंडेशनसाठी काम करीत असून सर्वांनी सामाजिक बांधीलकी जपत आपल्या आवकमधून समाजासाठीही काही देणे द्यावे, असे आवाहन केले.
गरजूंना मदत करा
त्यांना देण्यात आलेली भेट त्यांनी या वेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या जनकल्याण समितीला मदत म्हणून मृदुला कुलकर्णी यांच्याकडे मदत सुपूर्द केली. सेवालयाच्या कामाने आपण भारावून गेलो होतो. यापुढेही मदतीसाठी आपला प्रयत्न राहणार असून इतरांनीही गरजूंना मदत करावी, असे आवाहन त्यांनी केले.
मुलाखतीदरम्यान त्यांनी राधिका या पात्राविषयीदेखील मननोकळ््या गप्पा मारत मला शनयाचे पात्र अधिक आवडले होते, असे सांगितले.
कितीही ऊन असले तरी जळगावात यायचेच
जळगावातील ऊन सर्वच माहित असल्याने या मुलाखतीदरम्यान अनिता दाते यांनीही त्याचा उल्लेख केला. त्या म्हणाल्या की, लहानपणापासून मी जळगावात मामाकडे येत असे. येथे कितीही ऊन असले तरी मी न चुकता जळगावात यायची, असे सांगून त्या म्हणाल्या की, या सुट्टीच्या काळात मी मामे बहीण व इतर बच्चे कंपनीसोबत मनसोक्त खेळायचे. येथील विविध खेळ व भुलाबाईच्या पारंपारिक खेळांचाही उल्लेख त्यांनी या वेळी केला.
अभ्यासू वृत्ती, सकारात्मक वृत्तीने यश
कोणत्याही महिलेच्या जीवनात कधी कठीण प्रसंग येऊ नये, मात्र जीवनात कोणताही प्रसंग आला तरी खचून न जाता प्रत्येक महिलेने त्या प्रसंगास तोंड द्यावे व स्वत: उमीदेने उभे राहत यश मिळवावे, असे आवाहन केले. तसेच तरुणींना संदेश देताना अनिता दाते म्हणाल्या की, कोणत्याही बाबतीत अभ्यासू वृत्ती ठेवा, सकारात्मक विचार करा, चांगल्या लोकांसोबत रहा, तुम्हाला हमखास यश मिळेल, असा सल्ला अनिता दाते यांनी दिला.