पाचोरा तालुक्यात बारावीच्या परीक्षेत २८ विद्यार्थ्यांवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2019 10:53 PM2019-02-25T22:53:24+5:302019-02-25T22:54:30+5:30
बारावीच्या परीक्षेत कॉपी करताना आढळलेल्या २८ विद्यार्थ्यांवर भरारी पथकाने सोमवारी कारवाई केली. यात पाचोरा शहरातील एम.एम. महाविद्यालय आणि कासमपुरा, ता.पाचोरा येथील परीक्षा केंद्रांचा समावेश आहे.
पाचोरा, जि.जळगाव : बारावीच्या परीक्षेत कॉपी करताना आढळलेल्या २८ विद्यार्थ्यांवर भरारी पथकाने सोमवारी कारवाई केली. यात पाचोरा शहरातील एम.एम. महाविद्यालय आणि कासमपुरा, ता.पाचोरा येथील परीक्षा केंद्रांचा समावेश आहे.
सोमवारी बारावीच्या विज्ञान शाखा भौतिकशास्त्र या विषयाचा पेपर होता. पाचोरा शहरातील एम.एम. महाविद्यालय परीक्षा केंद्रास जळगाव डायटचे प्राचार्य डॉ.गजानन पाटील यांच्या भरारी पथकाने अचानक भेट दिली. तेव्हा विद्यार्थ्यांजवळ कॉप्या आढळल्या. त्यात १५ विद्यार्थ्यांवर पथकाने कारवाई केली.
सदर भरारी पथक कासमपुरा मार्गे जळगाव जात असताना कासमपुरा, ता.पाचोरा या परीक्षा केंद्रातही १३ विद्यार्थ्यांवर कारवाई केली.
डायट प्राचार्य डॉ.गजानन पाटिल यांच्या भरारी पथकाने केलेल्या या कारवाईमुळे खळबळ उडाली आहे. एम.एम.महाविद्यालयात १४ विद्यार्थी विज्ञान शाखेचे तर एक विद्यार्थी कॉमर्स शाखेचा होता. पाचोरा तालुक्यात एकूण चार परीक्षा केंद्रे असून, या केंद्रांवर बैठ्या पथकांची नेमणूक करण्यात आली आहे. मात्र भरारी पथकाच्या या कारवाईमुळे स्थानिक अधिकारी व बैठे पथकाच्या कार्यप्रणालीबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे.