‘थर्टी फर्स्ट’च्या रात्री १९३ वाहनधारकांवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2021 04:13 AM2021-01-02T04:13:49+5:302021-01-02T04:13:49+5:30
जळगाव : थर्टी फर्स्टच्या रात्री दारू पिऊन गाडी चालविणाऱ्या व इतर नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनधारकांवर कडक कारवाई करण्यासाठी पोलीस ...
जळगाव : थर्टी फर्स्टच्या रात्री दारू पिऊन गाडी चालविणाऱ्या व इतर नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनधारकांवर कडक कारवाई करण्यासाठी पोलीस विभागातील सर्व पोलीस फौज विविध चौकात लावण्यात आली होती. या पथकांकडून जिल्ह्यात १९३ वाहनधारकांवर कारवाई करण्यात आली. त्यामध्ये १४ जणांवर ‘ड्रिंक ॲण्ड ड्राइव्ह’ची कारवाई करण्यात आली आहे.
नववर्षारंभी अपघात होऊ नये किंवा रॅश ड्रायव्हिंगचा फटका इतर वाहनधारकांना बसू नये यासाठी दारू पिऊन गाडी चालविणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी थर्टी फर्स्टच्या रात्री दरवर्षी चौकाचौकांत, नाक्यावर पोलिसांचा चोख बंदोबस्त असतो. यंदा ५ जानेवारीपर्यंत रात्री ११ ते सकाळी ६ वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. म्हणून ११ वाजेच्या आत थर्टी फर्स्ट साजरा करण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यात दोन तास फटाके फोडण्याची मुभा देण्यात आली होती. मात्र, गुरुवारी थर्टी फर्स्टच्या रात्री रस्त्यावर कमी वाहने दिसून आली. दुसरीकडे शहरातील आकाशवाणी चौक, अंजिठा चौफुली, काव्यरत्नावली चौक, गणेश कॉलनी, टॉवर चौक, पांडे डेअरी चौक, काशीनाथ चौक, नेरी नाका, बहिणाबाई उद्यान आदी ठिकाणी रात्री ८ वाजेपासून फिक्स पॉइंट लावण्यात आले होते. याशिवाय शहरात पेट्रोलिंगसाठी पोलिसांचे पथक नेमण्यात आले होते.
चौकांमध्ये वाहनधारकांची थांबवून तपासणी
कडेकोट बंदोबस्त लावून अनेक चौकांमध्ये वाहनधारकांची थांबवून तपासणी करण्यात आली. या मोहिमेत जिल्ह्यात १४ वाहनधारक मद्यप्राशन करून वाहन चालवित असताना आढळून आले, तर १७९ वाहनधारक विनापरवाना, फॅनी नंबर प्लेट, ट्रीपल सीट, सीट बेल्ट न लावलेले आढळून आले. यांच्यावर कारवाई करून २५ हजार ४०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. जळगाव शहरात शहर वाहतूकतर्फे ड्रिंक ॲण्ड ड्राइव्हमध्ये ४, तर इतर नियमांचे उल्लंघन करणाऱ्यां ७३ जणांवर कारवाई करण्यात आली. रात्री बारा ते एक वाजेपर्यंत ही कारवाई सुरू होती.