चाळीसगावात बोगस व फॅन्सी नंबर प्लेट असलेल्या वाहनचालकांवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2019 07:52 PM2019-09-23T19:52:35+5:302019-09-23T19:53:06+5:30
ठिकठिकाणी फॅन्सी नंबर प्लेट असलेल्या १४ तर इतर ३० वाहने अशा एकूण ४४ वाहन चालकांविरुध्द कारवाई करण्यात आली.
चाळीसगाव, जि.जळगाव : शहर वाहतूक शाखेने शहर व परिसरात बिनधास्त व आपल्याच मस्तीत वावरणाऱ्या तसेच बोगस नंबर प्लेटधारक वाहनचालकांवर २३ रोजी कारवाई केल्याने चांगलाच चाप बसला आहे. शहरात ठिकठिकाणी फॅन्सी नंबर प्लेट असलेल्या १४ तर इतर ३० वाहने अशा एकूण ४४ वाहन चालकांविरुध्द कारवाई करण्यात आली.
शहर वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश शिरसाठ यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करण्यात आली. दिवसभर सुरू असलेल्या धडक कारवाईची वार्ता शहरात पसरल्याने इतरही बोगस नंबर प्लेटधारक दुचाकीचालकांनी पळ काढला.
दिवसभरात पकडलेली वाहने पोलीस ग्राऊंड येथे आणण्यात आली व त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली. बोगस नंबर प्लेटधारकांकडून जुन्या नियमाप्रमाणे एक हजार रुपये व नवीन नियमाप्रमाणे पाच हजार रुपये दंड प्रत्येकाकडून आकारण्यात आला. या मोहिमेत सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र चित्ते, हवालदार हेमंत शिरसाठ, पो.काँ.बापू पाटील, संतोष पाटील, सहभागी झाले होते. ही मोहीम यापुढे तीव्र केली जाईल. यासाठी बोगस नंबर प्लेट वाहनधारक तसेच फॅन्सी नंबर प्लेटधारकांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश शिरसाठ यांनी केले आहे.