भुसावळात ट्रिपल सीट वाहनधारकांवर कारवाईचा बडगा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2020 03:22 PM2020-11-19T15:22:10+5:302020-11-19T15:23:03+5:30
भुसावळ : शहरांमध्ये जानेवारी ते ऑक्टोबर या दहा महिन्यात तब्बल ३३१ ट्रिपल सीट दुचाकी चालवून नियमभंग करणाऱ्याकडून तब्बल ६६ ...
भुसावळ : शहरांमध्ये जानेवारी ते ऑक्टोबर या दहा महिन्यात तब्बल ३३१ ट्रिपल सीट दुचाकी चालवून नियमभंग करणाऱ्याकडून तब्बल ६६ हजार रुपयांचा दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. इतका दंड वसूल जरी केला असला तरी ट्रिपल सेट शहरात अजूनही जोरातच असल्याचे चित्र दिसत आहे.
शहरातील गांधी पुतळा, बस स्टँड चौक, डॉ.आंबेडकर पुतळा चौक, नाहाटा चौक, पांडुरंग चौक, अष्टभूजा चौक हे मुख्य चौक असून या ठिकाणी नेहमीच वाहतुकीची कोंडी होत असताना दिसत असते. वाहतूक शाखेकडून सातत्याने दंडात्मक कारवाई करण्यात येते. त्यातल्या त्यात जानेवारी ते ऑक्टोबर या दहा महिन्यांमध्ये ३३१ ट्रिपल सीट वाहनचालकांनी नियमभंग केले. त्यांच्याकडून वाहतूक शाखेतर्फे ६६ हजारांची दंडात्मक कारवाई करण्यात आली. फक्त ऑक्टोबर महिन्यात तब्बल ४७ ट्रिपल सीट वाहनचालकांवर केसेस झाल्या. त्यांच्याकडून ९ हजार ४०० इतकी दंडात्मक कारवाई करण्यात आलेली आहे.
वाहतूक शाखेतर्फे सातत्याने ठिकठिकाणी पथक लावून नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई करण्यात येत आहे. गेल्या १५ दिवसांपूर्वी वाहतूक शाखेतर्फे रिक्षा स्टॉप सोडून मध्येच रस्त्यावर रिक्षा लावणाऱ्या वर कारवाईचा बडगा उगारण्यात आला होता. आता वाहतूक शाखेच्या रडारवर ट्रिपल सीट चालक असल्याचे दिसून येत आहे.
गांधी पुतळा ठिकाणी सर्वात जास्त केसेस
जळगाव व यावल रोड ला जोडणाऱ्या गांधी पुतळा या ठिकाणी सर्वाधिक ९० ट्रिपल सीट चालवणाऱ्यांवर कारवाई करण्यात आलेली आहे.
"प्रत्येक वाहनचालकाने शासनाने दिलेल्या वाहनाचे नियमाचे पालन करणे अनिवार्य आहे. वाहन चालवत असताना अनेक वेळा वाहनाचे बॅलन्स बिघडते. यामुळे अपघाताला निमंत्रण मिळते व अनेक वेळा अशातून प्राणही गमवावा लागतो. ट्रिपल सीट वाहन चालवताना यापुढेही दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागेल.
-संदीप आराक, सहाय्यक पोलीस निरीक्षक, वाहतूक शाखा, भुसावळ