अपघातामुळे कारवाईचा फोन आला अन् तरुणाने भीतीपोटी जीव दिला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 04:28 AM2021-03-13T04:28:58+5:302021-03-13T04:28:58+5:30
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रशांत पाटील याच्याकडे चारचाकी वाहन आहे. २५ फेब्रुवारी रोजी एरंडोल येथून येताना ताडे गावाजवळ बैलगाडीला चारचाकीची ...
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रशांत पाटील याच्याकडे चारचाकी वाहन आहे. २५ फेब्रुवारी रोजी एरंडोल येथून येताना ताडे गावाजवळ बैलगाडीला चारचाकीची धडक लागली. त्यात बैलगाडी व चारचाकीचेही नुकसान झाले. यानंतर प्रशांत तेथून घरी न जाता गाडी दुरुस्तीसाठी जातो सांगून शिरसोली येथे मावशीच्या गावाला आला. शेतापासून काही अंतरावर चारचाकी लावून त्याने विहिरीत उडी घेतली. दुसरीकडे, दोन दिवस झाल्यानंतर प्रशांतशी संपर्क होत नाही व गाडी आढळून आल्याने कुटुंबीयांची चिंता वाढली. त्यामुळे त्यांनी कासोदा पोलीस ठाणे गाठून हरविल्याची तक्रार दिली. दुसरीकडे, त्याच दिवशी प्रशांत याला कोणी तरी फोन करून बैलगाडीच्या नुकसानीमुळे पोलीस ठाण्यात केस होणार असल्याचे सांगितले. त्या भीतीनेच त्याने आत्महत्या केली असावी, अशी शक्यता वर्तविली जात आहे. याबाबत कासोदा पोलीस ठाण्याच्या बीट अमलदारांनी सांगितले की, बैलगाडी मालक पोलीस ठाण्यात आले होते; मात्र त्यांनी कुठलीही तक्रार दिली नाही. आपसांत बसून तडजोड करणार आहोत असे त्यांनी सांगितल्याची माहिती अमलदारांनी निपाणेच्या वार्ताहरांना दिली. या घटनेमागे नेमके हेच कारण आहे की आणखी काही वेगळे याचा उलगडा पोलीस तपासातच होईल.
जागेवरच करणार शवविच्छेदन
विहिरीतून दुर्गंधी येत असल्याने मजुरांनी ही माहिती शेतमालकाला कळविली. दरम्यान, या घटनेची माहिती मिळाल्यानंतर दापोरा येथील पोलीस पाटील जितेंद्र गवंदे, शिरसोलीचे श्रीकृष्ण बारी व शरद पाटील यांनी घटनास्थळी धाव घेऊन एमआयडीसी पोलिसांना कळविले. पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे व सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह कुजलेला असल्याने पाण्यातच बरगड्या दिसून येत असल्याने जागेवरच शवविच्छेदन करावे लागणार आहे, गुरुवारी डॉक्टर उपलब्ध न होऊ शकल्याने आज, शुक्रवारी सकाळीच शवविच्छेदन होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. प्रशांत हा अविवाहित होता. त्याच्या पश्चात आई, वडील व विवाहित बहीण असा परिवार आहे.