कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली आमदारांची भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2021 04:13 AM2021-05-29T04:13:31+5:302021-05-29T04:13:31+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : फ्रंटलाईन वर्कर्सचा दर्जा देण्याच्या मागणीसह इतर मागण्यांसाठी महावितरणच्या कृती समितीचे पाचव्या दिवशींही आंदोलन ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : फ्रंटलाईन वर्कर्सचा दर्जा देण्याच्या मागणीसह इतर मागण्यांसाठी महावितरणच्या कृती समितीचे पाचव्या दिवशींही आंदोलन सुरूच होते. दरम्यान, आपल्या मागण्यांबाबत कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी आमदार सुरेश भोळे यांची भेट घेऊन, आपल्या मागण्या शासन दरबारी मांडण्याची मागणी केली. तसेच जो पर्यंत मागण्या मान्य होणार नाहीत, तो पर्यंत कामबंद आंदोलन सुरूच ठेवण्यावर ठाम असल्याचेही कळविले आहे.
कोरोनाच्या भयावह परिस्थितीतही काम करणाऱ्या महावितरणच्या कर्मचाऱ्यांना फ्रंटलाईन वर्कर्सचा दर्जा देण्यासह, वीज कर्मचाऱ्यांचे व त्यांच्या कुटुंबातील सदस्यांचे लसीकरण करावे, कोरोना मुळे मृत्यू पावलेल्या वीज कर्मचाऱ्याला महाराष्ट्र शासनाप्रमाणे ५० लाख अनुदान द्यावे, कोरोनामुळे वीज बिल वसुलीची सक्ती करू नये आदी मागण्यांसाठी कृती समितीने शासनाला नोटीस दिली आहे. शासनातर्फे वीज कर्मचाऱ्यांच्या कुठल्याही मागण्या मान्य केलेल्या नाहीत. तसेच या बाबत ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांच्याशी कृती समितीच्या राज्यस्तरीय पदाधिकाऱ्यांची चर्चा होऊनही यातूनही अद्याप कुठलाही तोडगा निघालेला नाही. त्यामुळे कृती समितीने जो पर्यंत शासनाकडून मागण्या मान्य होत नाही. तो पर्यंत काम बंद आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
इन्फो :
कृती समितीने घेतली आमदारांची भेट
कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी आमदार सुरेश भोळे यांची गुरुवारी सायंकाळी भेट घेतली. तसेच कृती समितीच्या विविध तालुका स्तरावरील पदाधिकाऱ्यांही त्या-त्या ठिकाणच्या आमदारांची भेट घेऊन आपल्या मागण्यांबाबत निवेदन दिले असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, जळगाव येथे आमदार सुरेश भोळे यांची कृती समितीचे पदाधिकारी तथा सबॉर्डीनेट इंजिनिअर्स असोसिएशन चे राज्य उपाध्यक्ष पराग चौधरी, सहसचिव कुंदन भंगाळे, सर्कल सचिव देवेंद्र भंगाळे, माजी सर्कल सचिव सुहास चौधरी, जळगाव विभागाचे सचिव मिलिंद इंगळे, वीज तांत्रिक कामगार युनियन आर. आर. सावकारे,भरत पंडित, विजय मराठे, वर्कर्स फेडरेशनचे वीरेंद्रसिंग पाटील, वीज क्षेत्र तांत्रिकचे प्रदीप पाटील, नासिर शेख, कामगार महासंघाचे दत्ता न्हावकर आदी पदाधिकाऱ्यांनी भेट घेतली.
इन्फो :
आंदोलनामुळे कामे खोळंबली
गेल्या पाच दिवसांपासून सुरू असलेल्या या कामबंद आंदोलनामुळे महावितरण अनेक प्रशासकीय कामे खोळंबली आहेत. या मध्ये थकबाकी वसुली करणे , वीज चोरी पकडणे, नविन कामांचे अंदाजपत्रक तयार करणे, वीज बिल वाटप, वीज बिलाबाबत समस्या सोडविणे, आदी कामे खोळंबली आहेत.