अतिक्रमण कारवाईत सातत्य हवे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2018 01:07 PM2018-05-10T13:07:27+5:302018-05-10T13:07:27+5:30
अजय पाटील
मनपाने मंगळवारपासून शहरात विशेष अतिक्रमण मोहीम राबविण्यास सुरुवात केली आहे.मनपा प्रशासनाने पाच महिन्यांपुर्वी देखील शहरात विशेष अतिक्रमण मोहिम राबविली होती. मात्र, शहरात पून्हा नो हॉकर्स झोन मध्ये सारखीच परिस्थिती निर्माण झाली. त्यामुळे मनपाला पुन्हा विशेष मोहीम राबवावी लागत आहे. मनपा प्रशासनाकडे अतिक्रमण कारवाईबाबत सातत्य नसल्याचे दिसून येत आहे. अतिक्रमणाची समस्या ही केवळ एका विशेष मोहीमेनंतर संपू शकत नाही. त्यासाठी सातत्य असणे गरजेचे आहे. अधिकारी किंवा आयुक्तांच्या सूचनानंतरच ही मोहीम राबविली जाते. तो पर्यंत शहरातील प्रत्येक भागात अतिक्रमणाचा विळखा वाढलेला असतो. दरम्यान, हॉकर्स व मनपा कर्मचाऱ्यांचा वाद दिवसेंदिवस वाढत जात असून, प्रत्येक अतिक्रमण निर्मुलन मोहीमेदरम्यान वाद निर्माण होत आहे. यामध्ये हॉकर्सचा हट्ट देखील कारणीभूत ठरत आहे. महापालिकेने हॉकर्सला ख्वॉजामिया चौक परिसरात व्यवसाय करण्यासाठी स्वतंत्र जागा उपलब्ध करुन दिली आहे. मात्र, त्या ठिंकाणी व्यवसाय करण्यास हॉकर्सचा नकार आहे. त्या जागेवर जात नसल्याने त्यांच्याकडून ‘नो हॉकर्स’ झोनमध्येच व्यवसाय सुरु आहे. यामुळे मनपा कर्मचाºयांशी खटके उडत आहेत. गोलाणी मार्केटमधील ग्राउंड फ्लोवर देखील हॉकर्सला व्यवसाय करण्याची जागा मनपाने दिली आहे. मात्र, त्या ठिंकाणी लकी ड्रॉ काढून ती प्रक्रिया देखील बारगळली आहे. दरम्यान मनपाकडून अतिक्रमण मोहिम सुरु झाल्यानंतर अनेकदा राजकीय दबाव देखील अधिकाºयांवर वाढत जात असतो. त्यामुळे अनेकदा कारवाईस देखील अडथळा येतो. त्यातच गेल्या आठवड्यात झालेल्या मनपा महासभेत नगरसेवक अनंत जोशी यांनी थेट उपायुक्त लक्ष्मीकांत कहार यांच्यावर हप्ते घेत असल्याचा आरोप केला होता. यामुळे देखील अतिक्रमण कारवाईबाबत अनेक प्रश्न निर्माण होतात. या आरोपानंतर कहार यांनी महात्मा फुले मार्केटमधील हॉकर्सवर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच त्यांनी या भागात प्रत्यक्ष पाहणी देखील करुन घेतली. ही तत्परता एखाद्या नगरसेवकाने आरोप लावल्यानंतर दाखविण्यापेक्षा कायम दाखविली तर नगरसेवकांना अधिकाºयांवर आरोप लावण्याची जागा देखील शिल्लक राहू द्यायला नको, अशी कारवाई मनपा प्रशासनाने करण्याची गरज आहे.
शहरातील अतिक्रमणाप्रमाणेच राष्टÑीय महामार्ग परिसरात देखील मोठ्या प्रमाणात अतिक्रमण वाढले आहे. समांतर रस्त्यांचे काम देखील रखडले आहे. महामार्गालगतचे अतिक्रमण काढण्याबाबत मनपा कडून राष्टÑीय महामार्ग प्राधिकरणच्या अधिकाºयांना बैठकीसाठी वेळ मागून देखील वेळ मिळत नसल्याने ही कारवाई देखील रखडली आहे.