भुसावळात मालेगाव पॅटर्न काढ्यावर अन्न व औषध प्रशासन विभागाची कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2020 09:22 PM2020-09-05T21:22:53+5:302020-09-05T21:23:49+5:30
मालेगाव पॅटर्न युनानी काढ्याच्या निर्मिती फॅक्टरीवर अन्न व औषध प्रशासनाने छापा टाकून कारवाई केली आहे.
भुसावळ : येथील राष्ट्रीय महामार्गाला लागून असलेल्या अयान कॉलनीतील इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये बेकायदा सुरू असलेल्या मालेगाव पॅटर्न युनानी काढ्याच्या निर्मिती फॅक्टरीवर अन्न व औषध प्रशासनाने छापा टाकून कारवाई केली आहे. यात एक लाख दोन हजार रुपयांचा माल (काढा) व ८५ हजार रुपयांच्या दोन मशनरी जप्त करण्यात आल्या आहेत. तब्बल सहा तास कारवाई करण्यात आली. माजी उपनगराध्यक्ष तथा नगरपालिकेचे भाजप गटनेते मुन्ना इब्राहिम तेली यांच्या मालकीचा हा कारखाना आहे. त्यामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.
कोरोना आजारावर उपयुक्त ठरत असल्याचा दावा माजी उपनगराध्यक्ष तथा गटनेते मुन्ना तेली यांनी करून प्रथम युनानी काढ्याची विक्री केली. त्यानंतर लोकांचा वाढता प्रतिसाद पाहता अयान कॉलनीतील मॉडर्न शिक्षण संस्था संचलित इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये दोन मशनरी आणून एका खोलीमध्ये हा काढा बनवण्याची फॅक्टरी सुरू केली. गेल्या चार ते पाच महिन्यांपासून ही फॅक्टरी सुरू असल्याचे समजते. यासंदर्भात ही फॅक्टरी बेकायदेशीर असल्याची तक्रार आठ दिवसांपूर्वी येथील एका नागरिकाने केली. त्यामुळे धुळे येथील अन्न व औषध प्रशासन विभागाचे निरीक्षक तथा जळगाव येथील कार्यालयाचे प्रभारी सहायक आयुक्त शां. ना. साळवे , जळगाव येथील निरीक्षक ए. एम. माणिकराव, जळगाव जिल्हा अन्न सुरक्षा अधिकारी साळवे यांच्यासह अन्य अधिकाऱ्यांनी अचानक छापा टाकून कारवाई केली.
दरम्यान, कोरोनामुळे शहरात नव्हे तर जगात नागरिक भयभीत झाले आहे. या संसर्गापासून वाचण्यासाठी काढा मिळत असल्याचे पाहून केवळ शहरातच नव्हे तर राज्यात, मध्य प्रदेश व गुजरात येथेही या काढायची मागणी असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे या काढायचे मोठ्या प्रमाणात विक्री झाली असल्याचे दिसून आले.
पैशांसाठी नव्हे तर जनसेवेसाठी निर्मिती
जनतेच्या सेवेसाठी हा काढा विकण्यात येत होता, अशी प्रतिक्रिया न. पा. गटनेते मुन्ना इब्राहिम तेली यांनी व्यक्त केली आहे.