अबब! विनातिकीट, विनामास्कसह धूम्रपान करणाऱ्या ६९ हजार प्रवाशांवर कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: March 5, 2022 11:49 AM2022-03-05T11:49:05+5:302022-03-05T11:50:03+5:30
भुसावळ रेल्वे प्रशासनाच्या वाणिज्य विभागाने गेल्या महिन्यात विविध एक्स्प्रेस गाड्यांमध्ये ही कारवाई मोहीम राबविली.
- सचिन देव
जळगाव : रेल्वे प्रशासनातर्फे कोरोनाचा संसर्ग कमी झाल्यानंतरही जनरल तिकीट वा मासिक पासची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली नाही. त्यातच प्रवाशांना आरक्षित तिकीटही लवकर मिळत नसल्याने, प्रवाशांना नाइलाजास्तव विनातिकीट प्रवास करावा लागत आहे. मात्र, रेल्वे प्रशासनाने या प्रवाशांवर कारवाईचा बडगा उगारत, भुसावळ विभागात ६९ प्रवाशांवर दंडात्मक कारवाई केली आहे.
यात विनातिकीट प्रवाशांसह विनामास्क, धूम्रपान करणाऱ्या प्रवाशांचा समावेश असल्याचे सांगण्यात आले. तसेच ऑनलाईन काढलेले तिकीट कन्फर्म न झाल्यावर अनेक प्रवासी (पेनल्टी) दंडासह तिकिटाची रक्कम भरून प्रवास करीत असतात. अशा प्रवाशांचादेखील या कारवाईत समावेश आहे. अशा प्रकारे विविध प्रकारच्या कारवाईत प्रवाशांकडून भुसावळ रेल्वे प्रशासनातर्फे पाच कोटींच्या घरात दंड वसूल केला असल्याचे सांगण्यात आले.
महिनाभरात ५ कोटींचा दंड वसूल
भुसावळ रेल्वे प्रशासनाच्या वाणिज्य विभागाने गेल्या महिन्यात विविध एक्स्प्रेस गाड्यांमध्ये ही कारवाई मोहीम राबविली. यात विनातिकीट प्रवाशांवर ३५० रुपये दंड, विनामास्क १०० रुपये, धूम्रपान करणाऱ्यांवर २०० रुपये दंडाची कारवाई करण्यात आली. असा एकूण ६९ हजार २०० प्रवाशांकडून ५ कोटींच्या घरात दंड वसूल करण्यात आला आहे.
विनातिकीट ६९ हजार प्रवासी पकडले
रेल्वेच्या वाणिज्य विभागातर्फे विनातिकीट प्रवाशांवर कारवाईसाठी स्वतंत्र पथक तयार करण्यात आले आहे. तिकीट निरीक्षकांचे पथक भुसावळ विभागातून मुंबईला जाणाऱ्या-येणाऱ्या कुठल्याही गाडीत कारवाई मोहीम राबवित आहे. यामध्ये पूर्वीचे आरक्षित असलेले आणि कोरोनाकाळापासून जनरल केलेल्या डब्यांमध्ये अनेक प्रवासी विनातिकीट आढळून येत आहेत. अशा प्रकारे ६९ हजार २०० विनातिकीट प्रवासी पकडून रेल्वेतर्फे कारवाई करण्यात आली असल्याचे जनसंपर्क विभागातर्फे सांगण्यात आले.
कोरोनाकाळात सर्वाधिक फटका
कोरोनाकाळात नागरिकांना आरक्षणाशिवाय रेल्वेतून प्रवास करण्यास प्रतिबंध होता. त्यामुळे तिकीट कन्फर्म न झालेल्या नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागला. या प्रवाशांना नाइलाजाने विनातिकीट तर काही प्रवाशांनी पेनल्टी भरून प्रवास केला. त्यात तिकीट कन्फर्म नसल्यामुळे या प्रवाशांना जनरल बोगीतून उभे राहून प्रवास करावा लागला. एकंदरीत कोरोना काळात प्रवाशांना मोठ्या प्रमाणावर आर्थिक फटक्यासह मानसिक त्रासही सहन करावा लागल्याचे दिसून आले.