ग.स.चे माजी अध्यक्ष विलास नेरकर यांच्यावर कारवाईचे आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2021 04:16 AM2021-05-14T04:16:42+5:302021-05-14T04:16:42+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : ग.स.सोसायटीचे माजी अध्यक्ष तथा मळगाव शाळेचे शिक्षक विलास यादवराव नेरकर यांची योग्य ती चौकशी ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : ग.स.सोसायटीचे माजी अध्यक्ष तथा मळगाव शाळेचे शिक्षक विलास यादवराव नेरकर यांची योग्य ती चौकशी व त्यांच्यावर कारवाई करावी, असे आदेश नुकतेच प्राथमिक शिक्षणाधिकारी बी.एस.अकलाडे यांनी दिले आहेत. त्यासोबतच कार्यवाहीचा अहवाल तात्काळ शिक्षण विभागाला सादर करण्याच्या सूचनाही भडगाव गटशिक्षणाधिकारी यांना देण्यात आल्या आहेत.
पोलिसात आहे गुन्हा दाखल...
ग.स.सोसायटीतील लिपिक विजय प्रकाशराव पाटील यांना नियमित वेतन श्रेणीचा कोणताही आदेश देण्यात आलेला नसतांना तत्कालीन अध्यक्ष विलास नेरकर व तत्कालिन व्यवस्थापक संजय दत्तात्रय ठाकरे यांनी संगनमत करून बेकायदेशीरपणे विलास पाटील यांच्या नियमित श्रेणी आदेशावर तत्कालिन अध्यक्ष विलास नेरकर हे अध्यक्ष नसताना बनावट आदेशावर सह्या केल्या, त्यामुळे ही संस्थेची फसवणूक असल्याचे समोर आले होते. त्यानंतर ग.स.सोसायटीचे तत्कालिन अध्यक्ष मनोजकुमार पाटील यांच्या फिर्यादीवरून शहर पोलीस ठाण्यात नेरकर, ठाकरे यांच्याविरूध्द ८ फेब्रुवारी रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सीईओंना पाठविले पत्र...
विलास नेरकर हे भडगाव तालुक्यातील मळगाव जिल्हा परिषद शाळेत शिक्षक म्हणून आहेत. दरम्यान, त्यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर मार्च महिन्यात शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक धनंजय येरूळे यांनी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांना पत्र पाठवून नेरकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्याबाबत कळविले होते तसेच तपास सुरू असल्याचे पत्रात म्हटले होते.
काय म्हटले आहे आदेशात...
दरम्यान, नुकतचे प्राथमिक शिक्षण विभागाने ग.स.सोसायटी तत्कालिन अध्यक्ष विलास नेरकर यांची चौकशी करावी व त्यांच्यावर कारवाई करावी, असे आदेश काढलेले आहेत. शिक्षक विलास नेरकर हे आपल्या कार्यक्षेत्रात कार्यरत असल्याने तसेच सदर प्रकरणी कारवाईचे आदेश गटस्तरावर असल्याने आपल्या स्तरावर योग्य ती चौकशी व कारवाई करून, या प्रकरणी केलेल्या कार्यवाहीचा अहवाल तात्काळ कार्यालयास सादर करावा, असे आदेशात म्हटले आहे. या आदेशाचे पत्र भडगाव गटशिक्षणाधिकारी यांना पाठविण्यात आले आहे. तसेच चौकशी व कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आली असल्याची माहिती प्राथमिक शिक्षणाधिकारी यांनी बी.एस.अकलाडे यांनी लोकमतशी बोलताना दिली.