कोरोना संसर्गासह मृत्यूदर रोखण्यासाठी ‘अॅक्शन प्लॅन’ - नूतन जिल्हाधिकारी अभिजित राऊत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2020 12:27 PM2020-06-19T12:27:47+5:302020-06-19T12:28:11+5:30
परिस्थिीची माहिती घेत सर्वांना सोबत घेऊन नियोजन करणार
विजयकुमार सैतवाल
जळगाव : जळगाव जिल्ह्यात कोरोनाचा वाढता संसर्ग व मृत्यूदर रोखण्यासाठी यापूर्वीही येथे अधिकाऱ्यांनी उपाययोजना केल्याच आहे. आता आपण यासाठी येथील परिस्थितीची माहिती घेऊन व सर्वांना सोबत घेऊन कृती आराखडा (अॅक्शन प्लॅन) तयार करून कोरोनावर मात करण्याचा प्रयत्न राहणार असल्याचा मनोदय नूतन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी ‘लोकमत’कडे व्यक्त केला.
जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असताना सांगली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत यांची जळगावच्या जिल्हाधिकारीपदी बदली झाली. गुरुवार, १८ जून रोजी संध्याकाळी ते जळगावात पोहचले व पदभार स्वीकारला.
जिल्हाधिकारीपदी नियुक्ती झाल्यानंतर त्यांच्याशी ‘लोकमत’ने संवाद साधला असता विविध मुद्यांवर त्यांनी मनमोकळी चर्चा केली.
प्रश्न : कोरोनाच्या संकटात ही जबाबदारी आली असताना या कडे आपण कसे बघतात?
उत्तर : प्रशासकीय सेवेत काम करीत असताना विविध जबाबदाºया पार पाडाव्या लागतातच. आता कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी म्हणून जबाबदारी आली असली तरी ती संधी समजून जनतेच्या हितासाठी निर्णय घेतले जातील. प्रथम ‘कोरोना’वर अधिक लक्ष केंद्रीत राहणार आहे. या साठी आढावा घेत संपूर्ण टीमला सोबत घेऊन कोरोना रोखण्यावर भर राहणार आहे.
प्रश्न : जिल्ह्यात रुग्णसंख्येसोबतच मृत्यूदरही वाढता असल्याने यासाठी कसे नियोजन असेल?
उत्तर : वाढता मृत्यूदर ही बाब चिंताजनक आहेच. मात्र आपल्याला त्यावर मात करायची असल्याने त्या विषयी आपण नियोजन केले आहे. पदभार घेतल्यानंतर येथील सर्व परिस्थिती जाणून घेऊन मृत्यू रोखण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न केले जातील.
प्रश्न : रुग्ण संख्या व मृत्यू कमी करण्यासाठी काही लक्ष्य ठेवले आहे का?
उत्तर : तसे कोरोनामुक्ती हेच कोणत्याही अधिकाºयाचे लक्ष्य असेल. कोरोना उपाययोजनांसाठी आयसीएमआरच्या मार्गदर्शक सूचना तसेच केंद्र सरकार, राज्य सरकारच्या सूचना व आदेशाच्या अनुषंगाने उपाययोजना केल्या जातील. हे करीत असताना सर्वांना सोबत घेऊन काम करू.
प्रश्न : कोरोनासोबतच जिल्ह्यात वाळूचा मोठा प्रश्न आहे, त्याचे काही नियोजन असेल का?
उत्तर : शासन हिताचा विषय असेल तेथे लक्ष दिले जाईलच. सध्याच्या परिस्थितीत प्रथम प्राधान्य कोरोना उपाययोजनांवर राहणार आहे. मात्र हे करीत असताना गैर कारभारकडेही दुर्लक्ष केले जाणार नाही.
प्रश्न : जळगाव जिल्ह्यात टँकरची मोठ्या संख्या असते, याबाबत कसे नियोजन असेल?
उत्तर : गेल्या वर्षी झालेल्या अतिवृष्टीने सांगली जिल्ह्यात महापूर आला व अनेक जण बाधित झाले. ती परिस्थिती हाताळण्यात यशस्वी झालो. महाराष्ट्रात टंचाई व त्या अनुषंगाने टँकर हा विषय असतो. मात्र आता गेल्या वर्षाच्याच पावसामुळे टँकरची संख्या कमी राहिली व जळगाव जिल्ह्यातही अशीच स्थिती असेल. भविष्यात टंचाई उद््भवलीच तर त्याच्या निवारार्थ आवश्यक त्या उपाययोजना केल्या जातील.
तीन पुरस्कारांनी सन्मानित
नवे जिल्हाधिकारी डॉ. अभिजित राऊत हे सांगली येथे जिल्हा परिषदेचे सीईओ म्हणून कार्यरत होते. तेथील तीन वर्षाच्या कालावधीत राज्य शासनाचा पंचायत राज पुरस्कार तसेच केंद्र सरकारचा स्वच्छता दर्पण हा पुरस्कार जिल्हा परिषदेला मिळाला. तसेच ग्रामीण विकासासाठी त्यांना कास्य पदकदेखील मिळालेले आहे.
२०१४ ते २०१५ या काळात राऊत यांनी प्रशिक्षणार्थी सहायक जिल्हाधिकारी म्हणून काम पाहिले. या सोबतच केंद्र सरकारच्या मानव संसाधन विभागात शालेय शिक्षण विभागाचे सहायक सचिव, नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा येथे २०१५ ते २०१७ या काळात सहायक जिल्हाधिकारी व प्रकल्प अधिकारी म्हणून काम पाहिले आहे.
आयएएस असलेले राऊत हे सांगली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून मे २०१७ पासून कार्यरत होते. सांगलीत गतवर्षी आॅगस्टमध्ये आलेल्या महापुरात कृष्णा आणि वारणा नदीकाठच्या १०४ गावांना तडाखा बसला होता. या परिस्थितीत जिल्हा परिषदेने आपत्कालीन यंत्रणा उत्तमपणे राबवली होती. पुरानंतर साथीच्या रोगाचा प्रसार होणार नाही, याबाबत घेण्यात आलेली खबरदारी त्यांच्या प्रयत्नाने यशस्वी झालेली होती. त्यांच्या कार्यकाळात तेथे विकासकामांना गती मिळाली.