मधुकर सहकारी कारखान्यावर आरआरसीची कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2019 12:28 PM2019-05-25T12:28:52+5:302019-05-25T12:29:22+5:30
एफआरपी रक्कम अदा केली नाही
फैजपूर, जि. जळगाव : मधुकर सहकारी साखर कारखान्याने संपलेल्या गळीत हंगामातील शेतकऱ्यांची १५ कोटींच्या जवळपास एफआरपी रक्कम अदा न केल्याने साखर आयुक्त कार्यालयाने ‘मधुकर’चा साखर साठा तसेच जंगम, स्थावर मालमत्ता जप्ती करून तिची विक्री करावी व ऊस उत्पादकांना व्याजासह एफआरपी रक्कम अदा करावी, असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. तशी कारवाईची नोटीस मधुकर कारखान्यालासुद्धा २२ रोजी प्राप्त झाली आहे
मधुकर सहकारी साखर कारखान्याचा २०१८/१९ चा हंगाम नुकताच संपला. या हंगामात कारखान्याने ऊस उत्पादक शेतकºयांना १९२१.६८ मेट्रिक टन याप्रमाणे एफआरपी देण्याचे जाहीर केले होते. त्यानुसार ‘मधुकर’ने ऊस उत्पादक शेतकºयांना डिसेंबर २०१८ ते जानेवारी २०१९ या कालावधीत पुरवलेल्या उसाचे रुपये १६०० मेट्रिक टन याप्रमाणे ऊस उत्पादक शेतकºयांना रक्कम अदा केली होती. मात्र उर्वरित रक्कम ३२१.६८ व फेब्रुवारी ते २३ मार्च दरम्यानचे संपूर्ण १९२१.६८ मेट्रिक टनप्रमाणे थकीत रक्कम ऊस उत्पादक शेतकºयांना वेळेत अदा करण्यात आली नाही. ही रक्कम १५ कोटी रुपयांच्या जवळपास आहे. त्यामुळे साखर आयुक्त पुणे शेखर गायकवाड यांनी ‘मधुकर’वर आरआरसीची कारवाई केली आहे.
साखर आयुक्त कार्यालयाकडून कारवाईची नोटीस प्राप्त झाली आहे. शेतकºयांच्या उसाची थकीत रक्कम देण्यासाठी कारखाना कटिबद्ध आहे. त्यासाठी जिल्हा बँकेकडे पाठपुरावा सुरू आहे. आलेल्या तांत्रिक अडचणी सोडवून रक्कम उपलब्ध होताच शेतकºयांना थकीत एफआरपीची रक्कम अदा करण्यात येईल.
-शरद महाजन, चेअरमन, मधुकर सहकारी साखर कारखाना