अमळनेरातील दोन रेशन दुकानांवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2019 01:17 AM2019-07-24T01:17:10+5:302019-07-24T01:17:37+5:30
एका दुकानाचा परवाना रद्द
जळगाव - स्वस्त धान्य दुकानांच्या तपासणीदरम्यान अमळनेर येथील दोन स्वस्त धान्य दुकानांवर त्रुटी आढळून आल्याने जिल्हा पुरवठा अधिकारी सुनील सुर्यवंशी यांनी कारवाई करीत एका दुकानाचा परवाना रद्द केला तर दुसºया दुकानाची १०० टक्के अनामत रक्कम जप्त केली.
जिल्हा पुरवठा अधिकारी सुनील सुर्यवंशी यांनी अमळनेर तालुक्यातील रेशन दुकानांची तपासणी केली. यात अमळनेर येथील शेतकरी सहकारी संघ येथील स्वस्त धान्य दुकानात अनेक त्रुटी आढळून आल्या. या दुकानाची १०० टक्के अनामत रक्कम जप्त करण्यात आली. या सोबतच अनिता भागवत कासारे यांचे दुकान बंद आढळून आले. बंद दुकानाबाबत लाभार्थ्यांचे जबाब घेऊन दुकानाचे प्राधिकारपत्र रद्द करण्याची कारवाई पुरवठा अधिकारी सुर्यवंशी यांनी केली.
अनेक ठिकाणी अनियमितता
जिल्ह्यात स्वस्त दुकान धान्य तपासणी दरम्यान मोठी अनियमितता आढळत असल्याचे तपासणी दरम्यान आढळून येत आहे. पुरवठा अधिकारी सुर्यवंशी हे जिल्ह्यातील स्वस्त धान्य दुकानांची तपासणी करीत असून धरणगाव, अमळनेर तालुक्यात तपासणी करण्यात आली.
बरेच दुकानदार लाभार्थींचे ठसे घेऊन त्यांना पूर्ण धान्य देत नसल्याचेही समोर आले असल्याचे त्यांनी मान्य केले. बरेच दुकानदार पावत्यादेखील देत नसल्याने लाभार्थ्यांच्या नावावर किती धान्य दाखविण्यात आले, हे त्याला समजत नाही. त्यामुळे उर्वरित धान्य इतरत्र विक्री होत असल्याचा अंदाज त्यांनी व्यक्त केला.
या सर्व प्रकाराला आळा बसण्यासाठी जिल्ह्यातील स्वस्त धान्य दुकानांची तपासणी केली जाणार असून अनियमितता, त्रुटी आढळल्यास थेट कारवाई करण्याचा इशारा सुर्यवंशी यांनी दिला आहे.