मोकाट फिरणाऱ्या गृहविलगीकरणातील बाधितांवर होणार कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2021 04:20 AM2021-04-30T04:20:38+5:302021-04-30T04:20:38+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : जिल्ह्यातील कोरोनाची साखळी खंडित करण्यासाठी कोविड विषाणू संक्रमित नागरिकांचा शोध घेऊन त्यांच्यावर जिल्हा ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : जिल्ह्यातील कोरोनाची साखळी खंडित करण्यासाठी कोविड विषाणू संक्रमित नागरिकांचा शोध घेऊन त्यांच्यावर जिल्हा आरोग्य विभागामार्फत कारवाई करण्यात येणार आहे. ही माहिती संकलित करण्यासाठी नेहरू युवा केंद्र संघटनेच्या स्वयंसेवकांचा सहभाग असलेला कोविड संक्रमित नागरिक शोधमोहीम कक्ष स्थापन करण्यात आला असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील यांनी दिली. त्यात आता जे कोरोना बाधित गृहविलगीकरणात असूनदेखील मोकाट फिरत आहेत, त्यांच्यावर कारवाई होणार आहे.
कोविड संक्रमित नागरिकांच्या शोधमोहीम कक्षात व्हॉट्सॲप क्रमांक कार्यरत राहणार आहे. या मोबाईल क्रमांकावर जिल्ह्यातील जागरूक नागरिकांनी त्यांच्या परिसरात आढळणारे कोविड विषाणू संक्रमित नागरिक, कोविड व्हायरस वाहक नागरिकांचे नाव, पत्ता, आदी माहिती पाठवावी. जे नागरिक अशा संक्रमित रुग्णांची माहिती पाठवतील, त्यांचे नाव गोपनीय ठेवण्यात येणार आहे.
नागरिकांनी आपले सामाजिक कर्तव्य समजून आपल्या परिसरातील विषाणू संक्रमित नागरिकांचे नाव, पत्ता व उपलब्ध असल्यास मोबाईल क्रमांक, आदी माहिती प्रशासनास द्यावी, असे आवाहनही निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील यांनी केले आहे.