कामचुकार शिक्षकांवर होणार कारवाई, तीन परीक्षांमधील काढणार माहिती
By अमित महाबळ | Published: January 18, 2024 06:11 PM2024-01-18T18:11:02+5:302024-01-18T18:12:01+5:30
या संदर्भात परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला आहे.
जळगाव : प्रश्नपत्रिकेत चुका करणाऱ्या, तसेच उत्तरपत्रिकांच्या मूल्यांकन कामकाजात जाणूनबुजून सहभाग न घेणाऱ्या कामचुकार शिक्षकांवर आता विद्यापीठाकडून कारवाई केली जाणार आहे. त्यासाठी सध्याच्या हिवाळी परीक्षेसह आधीच्या दोन परीक्षांचीही माहिती काढण्यात येणार आहे. या संदर्भात परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला आहे.
कुलगुरू प्रा. व्ही. एल. माहेश्वरी यांच्या अध्यक्षतेखाली बुधवार, दि. १७ जानेवारी रोजी परीक्षा व मूल्यमापन मंडळाची बैठक झाली. मंडळाचे संचालक प्रा. योगेश पाटील यांनी बैठकीत झालेल्या निर्णयाविषयी माहिती दिली. परीक्षेच्या कामकाजाबाबत विद्यापीठाच्या आदेशाचे पालन न करणे ही बाब महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठे अधिनियम २०१६ मधील कलम ४८(४) मध्ये नमूद तरतुदीचे उल्लंघन करणारी असून, ज्या शिक्षकांनी जाणून-बुजून उत्तरपत्रिकांच्या मूल्यांकन कामकाजात सहभाग घेतला नाही त्या शिक्षकांवर कारवाई करण्याचा निर्णय या बैठकीत झाला.
सध्या हिवाळी परीक्षा सुरू असून, त्यांच्या उत्तरपत्रिकांचे कामकाज सुरू आहे. हे काम काही शिक्षकांनी वेगवेगळी कारणे सांगून टाळले आहे. या आधीच्या उन्हाळी व हिवाळी परीक्षेवेळीही हेच घडले होते. त्यामुळे या तीनही परीक्षांवेळी जाणूनबुजून उत्तरपत्रिका तपासणीचे काम टाळलेल्या शिक्षकांची माहिती काढून त्यांच्यावर कारवाई प्रस्तावित केली जाणार आहे. तसेच प्रश्नपत्रिकेच्या संदर्भात चुका केलेल्या शिक्षकांवरील कारवाईचे प्रस्ताव संबंधित समितीसमोर ठेवले जाणार आहेत.