इच्छुकांच्या सक्रियतेने भाजपपुढे पेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2019 08:40 PM2019-09-15T20:40:04+5:302019-09-15T20:41:05+5:30

मुलाखत देणाऱ्या इच्छुक उमेदवारांकडून फलकांद्वारे कार्याला उजाळा ; स्थानिक यात्रांमुळे राजकीय वातावरण तप्त, काँग्रेस, राष्टÑवादी आणि शिवसेनेत अद्यापही मतदारसंघाविषयी स्पष्टता नाही; एकमुखी नेतृत्वाचा जाणवतोय अभाव

With the activism of the aspirants, the BJP is screwed | इच्छुकांच्या सक्रियतेने भाजपपुढे पेच

इच्छुकांच्या सक्रियतेने भाजपपुढे पेच

Next

मिलिंद कुलकर्णी
पूर्वी काँग्रेसमध्ये उमेदवारीसाठी जोरदार प्रयत्न, शक्तीप्रदर्शन, पाठपुरावा, नेत्यांचा पाठिंबा मिळविण्याची धडपड आपण पाहिलेली आहे. कुणालाही उमेदवारी दिली तरी तो निवडून येईल, असे मानले जाई. आता फक्त पक्षाचे नाव बदलले, पण चित्र तसेच आहे. काँग्रेसऐवजी भाजपमध्ये उमेदवारीसाठी अशीच कसरत पहायला मिळत आहे. धुळे आणि चाळीसगावमध्ये तर इच्छुक उमेदवारांनी नरेंद्र मोदी, अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांची छायाचित्रे, पक्षचिन्हासह फलके लावली आहेत. हे चित्र पाहता असे वाटते की, भाजपच भाजपविरुध्द लढत आहे की काय?
विधानसभा निवडणुकीच्या आचरसंहितेविषयी वेगवेगळ्या तारखा सांगितल्या जात आहेत. मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेच्या समारोपाला १९ रोजी नाशकात पंतप्रधान नरेंद्र मोदी येणार असल्याने, त्यानंतरच निवडणुकीची घोषणा होईल, असे मानले जात आहे.
भाजप सध्या जोरात आहे. लोकसभा निवडणुकीप्रमाणे शेवटच्या दिवसापर्यंत अधिकृत उमेदवारांची यादी जाहीर होणार नाही, असा अंदाज आहे. थेट एबी फॉर्म दिले जातील. म्हणजे बंडखोरी टाळण्याचा त्यामागे प्रयत्न राहील. अर्थात ज्यांना तिकिटे मिळणार नाही, ते इतर पक्षांची उमेदवारी घेणार नाही, असेही सांगता येत नाही. ‘अभी नही तो कभी नही’ अशा अटीतटीवर उमेदवार आले असल्याने काहीही संभवते, असे राजकीय चित्र आहे.
पक्षश्रेष्ठी कुणाच्या पारड्यात वजन टाकतात, त्यावर उमेदवारी अवलंबून राहणार आहे. विद्यमान आमदारांनासुध्दा उमेदवारीची शाश्वती नाही, हे खुद्द जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी जळगावात स्पष्ट केले आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारदेखील अपक्ष उमेदवारी, इतर पक्षांची उमेदवारी असा ‘बी प्लॅन’ तयार करुन ठेवत असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. एक मात्र नक्की की, यंदाची निवडणूक ही रंगतदार आणि अभूतपूर्व अशा स्वरुपाची होणार आहे.
भाजप असा जोशात असताना शिवसेना, काँग्रेस आणि राष्टÑवादी काँग्रेसची अवस्था खान्देशपुरती तरी अवघड झालेली आहे. तिन्ही पक्षांची स्थिती एकमुखी नेतृत्वाच्या अभावामुळे चिंता निर्माण करणारी आहे. मातब्बर नेत्यांच्या मतदारसंघांमध्ये सुध्दा हेच चित्र आहे.
काँग्रेसने एक प्रशिक्षण शिबिर घेतले. जळगाव शहर, जामनेर आणि रावेरमध्ये हे शिबीर झाले. भुसावळमध्ये होणार होते, परंतु ऐनवेळी स्थगित करण्यात आले. याचा अर्थ तीन मतदारसंघामध्ये काँग्रेस उमेदवारीसाठी आग्रही राहील.
राष्टÑवादी काँग्रेसची बैठक झाली. जिल्हाध्यक्षांनीच उमेदवारीस नकार दिला. त्यानंतर मुक्ताईनगरात संभाव्य पाच उमेदवारांनीही नकार दिल्याची माहिती समोर येत आहे.
शिवसेना नंदुरबार, धुळ्यात कोणत्या जागांसाठी आग्रही राहणार आहे, हे अजून स्पष्ट झालेले नाही. जळगाव जिल्ह्यात जळगाव ग्रामीण, पाचोरा हे विद्यमान आमदारांचे मतदारसंघ आहेत. चोपड्यात समीकरणांची नव्याने मांडणी केली जात आहे.
सुरेशदादा जैन, गुलाबराव देवकर व प्रा.चंद्रकांत सोनवणे यांच्या संभाव्य उमेदवारीविषयी सोमवारी औरंगाबाद खंडपीठात काय होते, त्यावर सारे अवलंबून राहणार आहे. त्यामुळे राजकीय पातळीवरील अनिश्चितता अजूनही कायम आहे.
भाजपमध्ये प्रचंड सक्रियता असताना काँग्रेस, राष्टÑवादी काँग्रेस आणि शिवसेनेत संभ्रम आणि गोंधळाचे वातावरण कायम आहे. जागावाटप झालेले नसल्याने नेमके चित्र स्पष्ट झालेले नाही. प्रबळ दावेदार असलेले उमेदवार मतदारसंघात यात्रा काढत आहेत तर मुक्ताईनगरसारख्या मतदारसंघात उमेदवारी नको, म्हणून राष्टÑवादी काँग्रेसमध्ये अहमहमिका लागली आहे. एकमुखी नेतृत्व नसल्याने महिनाभरावर निवडणूक आली तरी इतर पक्षांची भूमिका अद्याप स्पष्ट नाही.

Web Title: With the activism of the aspirants, the BJP is screwed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.