वणवा नियंत्रणासाठी वन्यजीव प्रेमींसह वन्यजीव संरक्षण संस्थेचे कार्यकर्ते सरसावले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2021 04:15 AM2021-03-07T04:15:16+5:302021-03-07T04:15:16+5:30
जळगाव : यावल पश्चिम वनक्षेत्रात लागलेला वणवा थांबत नसल्याने हा वणवा नियंत्रणासाठी वनविभागाचे प्रयत्न सुरू आहे. यासाठी चोपडा येथील ...
जळगाव : यावल पश्चिम वनक्षेत्रात लागलेला वणवा थांबत नसल्याने हा वणवा नियंत्रणासाठी वनविभागाचे प्रयत्न सुरू आहे. यासाठी चोपडा येथील वन्यजीव प्रेमींसह वन्यजीव संरक्षण संस्थेचे कार्यकर्ते मदतीसाठी सरसावले आहेत. यासाठी लोकसहभागाची आवश्यकता असून नागरिकांनी पुढे यावे, असे आवाहन केले आहे.
अतिक्रमण, शिकार तसेच जंगलात विडी पेटवून फेकणे या कारणांमुळे जंगलामध्ये वणवे लागत आहेत. विशेषत: अतिक्रमण करण्यासाठी जंगलात आगी लावल्या जातात. त्याची झळ सातपुडा यावल वनक्षेत्रासदेखील बसत असल्याचे वन्यप्रेमींचे म्हणणे आहे. वनविभागाचे कर्मचारी आग नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न करीत असून त्यांच्यावर हल्लेदेखील झाल्याच्या घटना घडल्या आहेत. पाल, लंगडा आंबा, जामन्या गाडऱ्या भागात वणव्यांवर नियंत्रण येत असल्याचे या भागात आग नियंत्रणाचे काम करणाऱ्या वन्यजीव संरक्षण संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
सद्यस्थितीत सातपुड्यात पश्चिम भागात वणवा नियंत्रित करण्यासाठी वनविभागास लोकसहभागाची आवश्यकता आहे, असे वन्यजीव संरक्षण संस्थेचे म्हणणे आहे. चोपडा येथील वन्यजीव संरक्षण संस्थेचे कार्यकर्ते आणि इतर वन्यजीवप्रेमी तरुण वणवा नियंत्रित करण्यासाठी वनविभागाच्या मदतीला जात आहेत. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षातर्फेदेखील वणवा नियंत्रणासाठी विशेष तरतूद करण्याची मागणीदेखील केली जात आहे.
वन्यजीव संस्थेच्या कार्यकर्त्यांनी दोन दिवस आग नियंत्रणासाठी मदत केली. यासाठी अजून काही कार्यकर्ते जात असून वनकर्मचारी सलग काम करीत आहेत. अतिशय दुर्गम भागातदेखील वणवा नियंत्रणाचे काम सुरूच आहे. एका ठिकाणी आग नियंत्रणात आणल्यानंतर दुसऱ्या भागात आग लावली जात असल्याचा अनुभव येत असल्याचे सांगितले जात आहे. वणवा नियंत्रणासाठी स्थानिक नागरिकांचे सहकार्य नसल्याची खंत वन्यजीव संरक्षण संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.
५० वनकर्मचाऱ्यांवर भार असून चोपडा, अडावद येथून संस्थेचे कुशल अग्रवाल, वन्यजीव प्रेमी विश्राम तेले, डॉ. रवी कोळी, संदीप पाटील, उमाकांत धनगर, लकी गुजर, नितीन पाटील, ऋषिकेश पाटील, असे मोजकेच पर्यावरण कार्यकर्ते मदतीला आहेत. जास्तीत जास्त लोकसहभागाची आवश्यकता असून दररोज किमान चार ते पाच तास मदतीला जावे, असे आवाहन वन्यजीव संरक्षण संस्थेचे बाळकृष्ण देवरे यांच्यातर्फे करण्यात आले आहे.