आदर्श शिक्षक कुंझरकर यांच्या खुनाची घटना सीसीटीव्ही मध्ये कैद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2020 04:41 AM2020-12-17T04:41:47+5:302020-12-17T04:41:47+5:30
जळगाव : एरंडोल तालुक्यातील आदर्श शिक्षक किशोर पाटील कुंझरकर यांना मारहाण होत असताना काही जणांनी पाहिले असून ही घटनाही ...
जळगाव : एरंडोल तालुक्यातील आदर्श शिक्षक किशोर पाटील कुंझरकर यांना मारहाण होत असताना काही जणांनी पाहिले असून ही घटनाही सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. घटना बघणारे मारेकऱ्यांना ओळखत असून त्यांची दहशत किंवा भीतीमुळे माहिती द्यायला कोणीही पुढे येत नसल्याचे तपासात समोर आले आहे. त्यामुळे हे प्रकरण पोलिसांसाठी आव्हानात्मक बनले असले तरी तपास अंतिम टप्प्यात आहे. मारेकरी गजाआड होतीलच, असा ठाम विश्वासही वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी ‘लोकमत’ शी बोलताना व्यक्त केला.
गालापूर येथे जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षक असलेल्या किशोर पाटील कुंझरकर यांचा मृतदेह ९ रोजी सकाळी पळासदळ शिवारात आढळून आला. प्रारंभी ह्वदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला असावा असे तर्क लढविले जात असतानाच शवविच्छेदन अहवालात डोक्याला मार लागून मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाल्याने हा खून असल्याचे उघड झाले. त्यामुळे या प्रकरणात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. कुंझरकर यांना एरंडोल पोलीस ठाण्यापासून अवघ्या एक कि.मी.अंतरावर मारण्यात आले व तेथून त्यांना उचलून पळासदळ शिवारात टाकण्यात आला. घटनास्थळावर काहीच झाले नाही असे दाखविण्याचा प्रयत्न झाला. जेथे कुंझरकर यांना मारहाण झाली तेथील सीसीटीव्ही फुटेजमध्ये एक जण मारहाण करताना कैद झाला आहे. आणखी काही जण तेथे असल्याचे सांगण्यात येत आहे. ही घटना पाहणाऱ्यांनी तेथून काढता पाय घेतला. नंतर कुंझरकर यांचा मृत्यू झाल्याचे समजल्याने त्यांनी तोंडावरच बोट ठेवले.
सकाळी फोन कॉल नाही, धुळ्यासाठी पडले घराबाहेर
१) किशोर पाटील कुंझरकर यांना सकाळी मोबाईलवर कॉल आला असे सांगण्यात येत होते, मात्र तसे काहीच झाले नसल्याचे तपासात उघड झाले आहे. पहाटे चार वाजता मोबाईलमध्ये इंटरनेट सेवा सुरु झाली आहे. कुंझरकर व काही सहकारी बुधवार दि.९ रोजी सुरत येथे जाणार होते. त्यांच्यासोबतचे सहकारी धुळ्यात थांबले होते.
२) कुंझरकर बसने धुळ्यात व तेथून शिक्षकांसोबत कारने सुरतला जाणार होते, त्यासाठीच ते पहाटे चार वाजता घराबाहेर पडले. ज्या अर्थी ही घटना सकाळी घडली, त्याअर्थी कुंझरकर केव्हा बाहेर येणार हे मारेकऱ्यांना माहिती होते, त्यांची संपूर्ण माहिती त्यांना होती. बाहेर दबा धरुनच ते बसले होते असेही तपासात उघड झाले आहे.
३) कुंझरकर यांना ठार मारायचे होते की फक्त मारहाण करायची होती हे देखील अजून स्पष्ट झालेले नाही. कारण झटापटीत कुंझरकर जमिनीवर पडले व डोक्याला मार लागून त्यात त्यांचा मृत्यू झाला आहे, असाही तपासात एक भाग पुढे येत आहे.
४) कुंझरकर यांना पहाटे दोन वाजता कॉल आला व ते घराबाहेर पडले या केवळ अफवाच असल्याचे पोलिसांनी सांगितले. एकूणच हा गुन्हा उघड होण्याइतपत पुरावे पोलिसांच्या हाती लागले असून येत्या दोन दिवसात बऱ्याच गोष्टींचा उलगडा होण्याची शक्यता आहे. सीसीटीव्ही फुटेज महत्वाचा पुरावा पोलिसांकडे आहे.