जळगाव जिल्ह्यातील परस्पर विक्री झालेल्या वनजमिनींची अपर जिल्हाधिकारी मंगळवारी करणार पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2018 12:21 PM2018-10-13T12:21:26+5:302018-10-13T12:21:43+5:30
बनावट सातबारा उतारा तयार केल्याचा संशय
जळगाव : जळगाव व भुसावळ तालुक्यातील भागपूर, कंडारी, उमाळे शिवारातील परस्पर विक्री केलेल्या वनविभागाच्या जमिनीची मंगळवार, १६ आॅक्टोबर रोजी आपण स्वत: प्र्रत्यक्ष जाऊन पाहणी करणार असल्याची माहिती अपर जिल्हाधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी दिली.
जळगाव व भुसावळ तालुक्यातील भागपूर, कंडारी, उमाळे शिवारातील वनविभागाच्या जमीन परस्पर विक्री झाल्याच्या प्रकरणास ‘लोकमत’ने वाचा फोडली. १०० कोटींहून अधिक असलेल्या या जमीन घोटाळ्याबाबत ‘लोकमत’ने वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या आदेशान्वये जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशी समिती नेमली आहे. या समितीमार्फत तपास सुरु आहे.
चौकशी समितीमार्फत तपास सुरू असताना त्यांचा अहवाल येईलच. या दरम्यान मंंगळवारी आपण प्रत्यक्ष जाऊन पाहणी करणार असल्याची माहिती गाडीलकर यांनी दिली.
महसूल विभागाचे बनावट शिक्के, तसेच कागदपत्रे तयार करून वनविभागाच्या जमिनींचेच गट क्रमांक वापरून सातबारा तयार करण्यात आले असण्याची शक्यताही गोरक्ष गाडीलकर यांनी व्यक्त केली.