जिल्हा बँकेतील सत्तेचा दुरूपयोग करीत खडसेंच्या मुक्ताई कारखान्याला जादा कर्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2020 12:19 PM2020-01-10T12:19:31+5:302020-01-10T12:19:53+5:30
आमदार चंद्रकांत पाटील यांचा आरोप : मुख्यमंत्र्यांकडे दूरध्वनीवरून तक्रार
जळगाव : एकीकडे सहकारी साखर कारखान्यांना किरकोळ रक्कमांचे कर्ज देण्यास, शेतकऱ्यांना कर्ज देण्यास टाळाटाळ करणाºया जिल्हा बँकेकडून माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या कन्या व बँकेच्या अध्यक्षा अॅड.रोहीणी खडसे यांची भागीदारी असलेल्या संत मुक्ताई साखर कारखान्यास मात्र किंमतीपेक्षा जादा कर्ज दिले आहे. हा सत्तेचा दुरूपयोग असून या गैरप्रकाराबाबत मुख्यमंत्र्यांकडे दूरध्वनीवरून तक्रार केली आहे. सोमवारी मुख्यमंत्र्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन तक्रार देणार असल्याची माहिती अपक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी दिली.
गुरूवारी सायंकाळी पद्मालय विश्रामगृहावर आयोजित पत्रपरिषदेत त्यांनी हा आरोप केला.
आमदार पाटील यांनी सांगितले की, संत मुक्ताई शुगर अॅण्ड एनर्जी लि.घोडसगाव ता.मुक्ताईनगर हा खाजगी कारखाना आधी ४९ कोटींना शिवाजी जाधव यांनी घेतला. नंतर अॅड.रोहिणी खडसे ह्या त्यात भागीदार झाल्या. या खाजगी कारखान्यासाठी ५१ कोटी कर्ज जिल्हा बँकेने मंजूर केले. त्यापैकी उचल मात्र केवळ ३० कोटींचीच करण्यात आली.
मुख्यमंत्र्यांकडे केली तक्रार
जिल्हा बँकेत सहकारी कारखाने व शेतकऱ्यांना कर्जासाठी फिरवाफिरव होत असून खाजगी कारखान्यांवर मेहेरबानी केली जात आहे. या सर्व गैरकारभाराबाबत मुख्यमंत्र्यांशी दूरध्वनीवरून संपर्क साधून तक्रार केली. तसेच सोमवारी प्रत्यक्ष भेट घेऊन तक्रार करणार आहे. तसेच कोर्टातही याचिका दाखल केली असल्याचे आमदार पाटील यांनी सांगितले. सहकार मंत्र्यांशीही संपर्क साधला. मात्र संपर्क झाला नाही.
आमदार पाटील यांनी उपस्थित केलेले प्रश्न
कारखान्यास ५१ कोटींचे कर्ज मंजूर असताना ३० कोटींचीच उचल का केली?
आधी दिलेल्या कर्जाचे थकबाकीदार असताना नव्याने कर्ज कसे दिले जात आहे?
कारखान्याची किंमत ४९ कोटी असताना आधी ५१ कोटी कर्ज दिले. तसेच आता ८१ कोटी ९६ लाख व साखर तारण ठेवून ५५ कोटी देण्याची तयारी ठेवली आहे. कर्ज देताना तिप्पट रक्कमेची मालमत्ता असे आवश्यक असताना ४९ कोटींच्या कारखान्यास १८८ कोटींचे कर्ज कसे दिले जाऊ शकते?
सहकारी क्षेत्रातील जिल्हा बँक सहकारी साखर कारखान्यांना कर्ज देण्यास टाळाटाळ करते. मात्र खाजगी कारखान्यावर इतकी मेहेरबानी का?
सहकार व खडसे समजायला दुसरा जन्म घ्यावा लागेल... खडसे, सहकार, कारखाना आणि जिल्हा बँक समजून घ्यायला आमदार चंद्रकांत पाटील यांना दुसरा जन्म घ्यावा लागेल. जिल्हा बँकेला उर्जितावस्था ती खाजगी कारखान्यांना कर्ज दिल्यामुळेच. सुमारे ४० कोटी रूपये बँकेला व्याजापोटी भरले. मधुकर सहकारी साखर कारखाना बंद आहे. त्याला सरकारची थकहमी पाहिजे. चंद्रकांत पाटील हे सत्तेत आहेत. त्यांनी सरकारकडून मसाकाला थकहमी मिळवून द्यावी. सहकारी व खाजगी कारखान्यातील फरक त्यांनी समजून घेतला पाहिजे. खाजगी कारखान्याला थकहमी लागत नाही. तसेच संत मुक्ताई कारखान्याची किंमत आता ११० कोटी रूपये आहे. त्यावर ३० कोटी कर्ज आहे. ते देखील विजनिर्मितीसाठी घेतले आहे. रोज वीज विकतो. रोज पैसा बँकेच्या एस्क्रो अकाऊंटला जमा होतो. मात्र चंद्रकांत पाटील यांना जास्त महत्व देण्याची गरज नाही. त्यामुळे त्यांच्या आरोपांची दखल घ्यावी, असे वाटत नाही.
-एकनाथराव खडसे, माजी आमदार व संचालक जिल्हा बँक.
मी अदानीपेक्षा मोठा
चंद्रकांत पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना खडसे हे जिल्ह्याचे अदानी असल्याचा आरोप केला होता. त्याला खडसे यांनी ‘मी अदानीपेक्षा मोठा आहे’ असे प्रत्युत्तर दिले.
सेनेचेच उपाध्यक्ष अन् संचालक
जिल्हा बँकेत शिवसेनेचेच उपाध्यक्ष व संचालक असल्याचे तसेच राष्टÑवादीचेही संचालक असताना ते विरोध का करीत नाहीत ? अशी विचारणा केली असता आमदार पाटील म्हणाले की मी सेनेचा नाही, अपक्ष आमदार आहे. तसेच मला हा प्रकार चुकीचा वाटला म्हणून विरोध केला. त्या संचालकांनाही मी विरोध करण्याचे आवाहन करतो, असे सांगितले.