तर अंजनी धरणात अतिरिक्त पाणीसाठा होणे शक्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2021 04:20 AM2021-08-25T04:20:53+5:302021-08-25T04:20:53+5:30
अंजनी धरणाच्या उंचीच्या अर्ध्या भागापर्यंत पाणी साठवून त्या भागातील येणाऱ्या सोनबर्डी, हनुमंत खेडे, मजरे गावांचे व शेतीचे काही प्रमाणात ...
अंजनी धरणाच्या उंचीच्या अर्ध्या भागापर्यंत पाणी साठवून त्या भागातील येणाऱ्या सोनबर्डी, हनुमंत खेडे, मजरे गावांचे व शेतीचे काही प्रमाणात पुनर्वसन केले तर ७ ते ८ दलघमी अतिरिक्त पाणीसाठा मिळू शकतो. या अतिरिक्त पाणीसाठ्यामुळे जवळपास ७०० ते ८०० हेक्टर जास्तीची शेतजमीन सिंचनाखाली येऊ शकते, असे जाणकारांचे मत आहे. गेल्या दोन वर्षांपासून अतिरिक्त पाणी अंजनी नदीपात्रात सोडण्यात येऊन ते वाया गेले. या वाया गेलेल्या पाण्याचा शेतजमिनीसाठी उपयोग होऊ शकतो. वास्तविक अंजनी धरणाचे काम वाढीव उंचीनुसार करण्यात आलेले आहे, परंतु प्रत्यक्षात वाढीव उंचीनुसार अंजनी धरणात पाणीसाठा केला जात नाही. धरणामध्ये अतिरिक्त साठा केल्यास सुमारे ५०० हेक्टर जमीन ओलिताखाली येऊ शकते. या अनुषंगाने वाढीव पाणीसाठा केलेल्या उंचीनुसार विचार करता सोनबर्डी, हनुमंत खेडे, मजरे या गावांचे अंशतः पुनर्वसन करावे लागणार आहे
अंजनी धरणात अतिरिक्त पाणीसाठा केल्यास पुनर्वसन व शेतजमीन ताब्यात घेणे सोपे होईल व वाढीव उंचीसाठी धरणाच्या केलेल्या बांधकामाचा लाभ होऊ शकेल. येथील पुनर्वसनाची बाब सोडता जामदा कालवा, विस्तारीकरण व इतर अनुषंगिक बाबींवर होणारा खर्च वाचणार आहे. अंजनी पाणलोट क्षेत्रामधील शंभर टक्के पाणी अंजनी धरणातच साठवा, अशी मागणी जोर धरत आहे. अतिरिक्त वाया जाणारे पाणी साठवण्याची नितांत गरज आहे, यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील व स्थानिक आमदार चिमणराव पाटील यांनी पुढाकार घेऊन शेती सिंचनासाठी अंजनी धरणात अतिरिक्त जलसाठा करण्याबाबत शासनाकडे पाठपुरावा करणे गरजेचे आहे. अंजनी धरणामुळे एरंडोल व धरणगाव या दोन्ही तालुक्यांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे. याशिवाय दोन्ही तालुक्यांचा कायापालट होऊन शेतीला खूपच लाभ होणार आहे.
---
बी. एस. चौधरी