पत्ता बदलला, डिग्री सर्टिफिकेट भरकटलं?; वेबसाइट चेक करा
By अमित महाबळ | Published: January 18, 2024 06:21 PM2024-01-18T18:21:43+5:302024-01-18T18:21:54+5:30
मूल्यांकन प्रक्रियेत सहभागी झालेल्या सर्व शिक्षकांचे तसेच मूल्यांकन प्रक्रियेतील इतर सर्व घटकांचे या बैठकीत अभिनंदन करण्यात आले.
जळगाव : हिवाळी २०२३ च्या ज्या परीक्षेचे निकाल जाहीर झाले आहेत त्यांचे फोटोकॉपी, गुण पडताळणी आणि पुनर्मूल्यांकन, निकाल जाहीर होण्याची संभाव्य तारीख, निकाल सुधारित होण्याचा कालावधी याबाबत विद्यापीठाच्या संकेतस्थळावर न्यूज ॲण्ड अनाउंसमेंट या लिंकवर प्रसिध्द करण्यात आली आहे. ज्या अभ्यासक्रमांचे निकाल जाहीर झाले नाहीत, त्यांचे निकाल जाहीर झाल्यानंतर ही माहिती उपलब्ध करून दिली जाणार आहे, असे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक प्रा. योगेश पाटील यांनी सांगितले.
उन्हाळी २०२४ परीक्षेचे अर्ज भरण्याची मुदत संपण्यापूर्वीच हिवाळी परीक्षेचे फोटोकॉपी, गुण पडताळणी आणि पुनर्मूल्यांकनाचे निकाल जाहीर करण्याची कार्यवाही केली जाणार आहे. विद्यापीठाच्या हिवाळी परीक्षा दि. २६ ऑक्टोबरपासून सुरू होवून दि. १५ जानेवारीपर्यंत पार पडल्या. या सर्व परीक्षांचे निकाल ३० दिवसांच्या आत जाहीर झाले आहेत. मूल्यांकन प्रक्रियेत सहभागी झालेल्या सर्व शिक्षकांचे तसेच मूल्यांकन प्रक्रियेतील इतर सर्व घटकांचे या बैठकीत अभिनंदन करण्यात आले.
अवितरीत प्रमाणपत्रांची सूची प्रसिद्ध
विद्यापीठाच्या पहिल्या दीक्षांत समारंभापासून ते ३१ व्या दीक्षांत समारंभापर्यंत ज्या विद्यार्थ्यांनी पदवी प्रमाणपत्रांसाठी अर्ज करूनही प्रमाणपत्र नेलेले नाही किंवा टपालाव्दारे पाठविलेले पत्र अपूर्ण पत्त्यामुळे परत आलीत व संपर्क क्रमांक बदललेले आहेत, त्या अवितरीत प्रमाणपत्रांची एकत्रित तपशीलवार सूची विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार आहे. ज्या विद्यार्थ्यांनी ई-मेल दिले आहेत त्यांना प्रमाणपत्र घेवून जाण्याबाबत सूचित करण्यात यावे, असे परीक्षा व मूल्यमापन मंडळाची बैठकीत ठरल्याची माहिती प्रा. योगेश पाटील यांनी दिली.